रत्नागिरी : तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोकण किनारपट्टीला या वादळाचा थेट धोका नसला तरी त्याचे परिणाम मात्र कोकण किनारपट्टीला जाणवणार आहे. सध्या वातावरणात बदल झाले असून रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. जोडीला वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट देखील आहे. जिल्ह्यातील सर्वच भागांमध्ये सध्या पावसानं हजेरी लावली आहे. सध्या जिल्ह्यातील वातावरण पाहता आणि चक्रीवादळाची गती आणि त्याचा जिल्ह्यावर होणारा परिणाम पाहता जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू केली आहे. कोणत्याही कारणास्तव नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. यावेळी अत्यावश्यक सेवेतील दुकानं देखील बंद राहणार आहेत. वादळाचा प्रभाव ओसरलेपर्यंत किंवा जोर कमी होईपर्यंत हा निर्णय घेण्यात आला आहे. 


जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय काय?


तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उद्या जिल्ह्यात कडक संचार बंदी अर्थात कर्फ्यू असणार आहे. यावेळी नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई असून अत्यावश्यक सेवेतील दुकानं देखील बंद आहेत. तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव ओसरेपर्यत जिल्ह्यात हा नियम लागू असे. दरम्यान, एकंदरीत वादळाचा अंदाज पाहता उद्याचं लसीकरण देखील बंद असणार आहे. किनारपट्टी लगतच्या ज्या भागामध्ये संभाव्य धोका आहे अशा ठिकाणाहून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जाणार आहे. यावेळी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. 


खुशखबर! एकदिवस अगोदर मान्सून केरळात दाखल होणार! तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई सज्ज


कोरोना रूग्णांबाबत पूर्णता खबरदारी घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. चक्रीवादळ उद्या सकाळी राजापूर, आंबोळगड येथून 11 वाजता जिल्ह्यात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा प्रवास दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्णगड, सायंकाळी 5 वाजेपर्यंत रत्नागिरी असा असणार आहे. या वादळाचा राजापूरमध्ये जास्त धोका आहे. वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी असणार असून सोसाट्याचा वारा 80 ते 90 गतीने जाण्याची शक्यता आहे. प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. 


मागील वेळेस आलेल्या निसर्ग चक्रीवादळात वाऱ्याची गती 120 इतकी होती. यावेळी समुद्र किनाऱ्यावर असणारी विशेष करून राजापूर, आंबोळगड येथील नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव हलवण्यात आले आहे. मच्छिमारी करणाऱ्या सर्व नौका किनाऱ्यावर पोहोचल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. पर राज्यातील बोटी देखील किनाऱ्यावर आश्रयाला आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.