अकोला : यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागल्यावर त्याच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. अनेक वर्षांचं त्याचं स्वप्नं असलेली 'यूपीएससी' परीक्षा त्यानं 'क्रॅक' केली होती. कठोर परिश्रमानंतर त्यांनं आपल्या ध्येय्याला गवसणी घातली होती. जिल्हाधिकारी होऊन लोकांची सेवा करण्याचं त्याचं स्वप्नं आता पूर्णत्वास जाणार होतं. तर सर्वसामान्य तलाठ्याच्या मुलानं 'यूपीएससी'सारखी परीक्षा उत्तीर्ण केल्याने त्याच्या आई-वडिलांना झालेला आनंदही अगदी शब्दांच्या पार पलीकडचा होता. गावातलं पोरगं 'जिल्हाधिकारी' होऊन 'साहेब' म्हणून गावात येणार असल्यानं तांदळीवासियांनाही आनंद झाला होता. सोबतच अकोल्यात त्याचं घर असलेल्या जिल्हा परिषद कॉलनीची गल्लीही या आनंदात न्हाऊन निघाली होती. मात्र, या सर्वांचा आनंद कायमचा हिरावून घेतला तो 'कोरोना' नावाच्या आजारानं. कोरोनामुळे येणारा प्रत्येक दिवस काही तरी अघटीत घडल्याच्या बातम्या घेऊन येतो. अलीकडच्या काळात तर कोरोनामुळे तरुणांच्या झालेल्या मृत्यूचं प्रमाण खुप मोठं आहे. असाच एक हृदय पिळवटून टाकणारा मृत्यू अकोल्यात झाला आहे. 


ही दुर्दैवी गोष्ट आहे आहे अकोला जिल्ह्यातील तांदळी बुजरूक येथील प्रांजल नाकट या 25 वर्षीय तरुणाची. प्रांजलचा आज  हैद्राबाद येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे त्याची फुफ्फुसं बाधित झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी हैद्राबादला हलवण्यात आलं होतं. प्रांजलने यावर्षीच केंद्रीय लोकसेवा आयोगा (यूपीएससी)ची परीक्षा पास केली होती.  प्रांजलचं प्राथमिक आणि शालेय शिक्षण अकोल्यात झालं होतं. तर त्याचं अभियांत्रिकीचं शिक्षण पुण्याच्या सिंहगड महाविद्यालयात झालं आहे. प्रांजलवर आज संध्याकाळी अकोल्यातील मोहता मिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. 


मुलाला वाचवण्यासाठी आई-वडिलांची धडपड  
       
प्रांजलचे वडील प्रभाकर नाकट हे अकोला महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत आहेत. मुलगा प्रांजलच्या शिक्षणासाठी प्रभाकर आणि पत्नी अनुराधा यांनी अतिशय कष्ट झेललेत. या महिन्याच्या सुरुवातीला प्रांजलला कोरोनाची बाधा झाल्याचं निदान झालं. त्याला उपचारासाठी अकोल्यातील एका खाजगी दवाखान्यात हलवण्यात आलं. मात्र, कोरोनामुळे प्रांजलची फुफ्फुसं निकामी होत असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी हैदराबादला हलवण्याचा निर्णय त्याच्या कुटूंबियांनी घेतला. त्याला 6 मे रोजी अकोल्यावरून एअर अँब्यूलन्सने हैदराबादमधील 'यशोदा हॉस्पिटल'मध्ये हलवण्यात आलं होतं. मध्यंतरी दोन दिवसांपुर्वी त्याच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली होती. मात्र, आज पहाटे त्याची प्रकृती परत ढासळल्याने प्रांजलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी एका बापाचा सुरू असलेला संघर्षही आज प्रांजलच्या मृत्यूने थांबला. 


प्रांजलच्या उपचारासाठी सरसावले होते नातेवाईक, समाज  


अकोल्याच्या खाजगी इस्पितळात दाखल केल्यानंतर प्रांजलची तब्येत अत्यंत गंभीर झाली होती. त्यामुळे प्रांजलचे फुफ्फुस अतिशय नाजूक अवस्थेत होते.  जगण्याची आशा धूसर होत असताना आमदार अमोल मिटकरी आणि 'मराठा महासंघा'चे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून अकोल्याच्या डॉ. सतीश गुप्ता यांच्या मदतीने हैदराबादच्या माणसाच्या फुफ्फुसवर काम करणाऱ्या 'यशोदा हॉस्पिटल'चा शोध घेतला. कोरोनामुळे फुफ्फुसं बाधित झाल्यानंतर आई-वडिलांची मुलाचा जीव वाचावा यासाठी नातेवाईकांच्या मदतीने धडपड सुरू होती. एअर अँब्युलन्स आणि प्रांजलच्या उपचारासाठी 55 लाखांचा खर्च येणार होता. प्रांजलचे वडील प्रभाकर यांच्याकडे आपल्या मिळकतीतून वाचवलेले 28 लाखच होते. मात्र, समाज, नातेवाईक, मित्र यांच्या मदतीतून त्यांनी मुलासाठी 55 लाख रुपयांची जुळवणूक केली. यानंतर प्रांजलला उपचारासाठी 6 मे रोजी एअर अँब्युलन्सने हैदराबादच्या यशोदा हास्पिटलला हलवले गेलं. मात्र, दुर्दैवाने आज कोरोनासोबच्या लढाईत प्रांजल जीवनाची लढाई हरला. 


प्रांजलच्या आठवणींचा गहिवर 


प्रांजलचं संपूर्ण शिक्षण अकोल्यात झालं. अकोल्याच्या हिंदू ज्ञानपीठ शाळेत त्याचं दहावीपर्यंतचं शिक्षण झालं. तर बारावीही त्याने अकोल्यातच उत्तीर्ण केली. पुढे अभियांत्रिकीचं शिक्षण त्यानं पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये पूर्ण केलं. शालेय जीवनापसूनच अतिशय हुशार असलेल्या प्रांजलचं 'आयएएस' बनण्याचं स्वप्नं होतं. अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी नवी दिल्ली येथे गेला. अन अखेर मागच्या वर्षी त्याने ही परीक्षा उत्तीर्ण करीत आपल्या स्वप्नांना गवसणी घातली होती. या अभ्यासामुळे तो सोशल मीडियापासून पुर्णपणे दूर होता. मात्र, अकोला आणि पुण्यातील आपल्या अनेक मित्रांच्या तो कायम संपर्कात होता. यावर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तो लवकरच पिवळ्या 'अंबर' दिव्याच्या गाडीत घरी येणार असल्याचं आई-वडिलांना सांगायचा. मात्र, आज अँब्यूलन्सने घरी आलेलं त्याचा पार्थिवदेहच पाहण्याचा अत्यंत दुर्दैवी प्रसंग त्याच्या आई-वडील आणि नातेवाईकांवर ओढवला आहे. 
   
कोरोनानं आपल्या जगण्याचे संदर्भ पार बदलवून टाकलेत. अनेकांच्या स्वप्नांचा पार चुराडा केलात. तर प्रांजलसारखे अनेक उमदे तरूण-तरूणी त्यांची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच 'अकाली' संपून गेलेत. आयुष्यात कोरोनानं निर्माण झालेली पोकळी, रितेपण लवकर संपाव अशी अपेक्षा करूयात. प्रांजल नाकट या उमद्या तरूणाला 'एबीपी माझा'ची श्रद्धांजली...