नागपूर : टाटा समूह मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचं टाटा सन्सचे अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून सांगितले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 7 ऑक्टोबर रोजी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन यांना पत्र पाठवून नागपुरातील मिहान सेझमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचे सांगत त्यांचे त्याकडे लक्ष वेधले होते. त्यावर नटराज चंद्रशेखर यांनी हे पत्र लिहिलं आहे. 


मिहानमध्ये उद्योग पायाभरणीच्या संधीबाबत विदर्भ इकोनॉमिक डेव्हलपमेंट काऊंसिल म्हणजेच वेदने एक आराखडा तयार केला आहे. त्याचा उल्लेख नितीन गडकरी यांनी टाटा समूहाला पाठवलेल्या पत्रात केला होता. आता टाटा समूहाने नितीन गडकरी यांना पाठवलेल्या पत्रात टाटा समूहाची टीम नागपूर मिहान मधील उद्योग विस्ताराच्या संदर्भात वेदच्या संपर्कात राहील असे म्हटले आहे.


टाटा समूहाचा मिहान मधील प्रस्तावित एअरबस प्रकल्प गुजरात मध्ये गेल्यामुळे आरोप प्रत्यारोप होत असताना टाटा समूहाकडून नागपूरच्या मिहान सेझमध्ये उत्सुकता दाखवणे नागपूर आणि महाराष्ट्रासाठी सकारात्मक बातमी म्हणावी लागेल


टाटा समूहाचे अध्यक्ष नटराज चंद्रशेखरन यांनी केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांना पाठवलेल्या पत्राबद्दल विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलने समाधान व्यक्त केले आहे. नागपूरच्या मिहान एसईझेडमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध आहे. टाटा समूहाचे अनेक प्रकारचे उद्योग व व्यापार आहेत. त्यांच्या एअर इंडिया आणि विस्तारा या विमान कंपन्यांच्या अनुषंगाने मिहानमध्ये एमआरओ उभारला जाऊ शकतो. टाटा समूहाच्या बिग बास्केटसाठी नागपूरच्या मिहानमध्ये मोठे गोदाम निर्माण केले जाऊ शकतात. तसेच टाटा समूहाच्या ताज ग्रुप ऑफ हॉटेलसाठी ही नागपूरच्या मिहानमध्ये वाव आहे. ज्वेलरीच्या व्यवसायात टाटाचा तनिष्क ब्रांड कार्यरत असून त्यासाठीही नागपूरच्या मिहान प्रकल्पामध्ये संधी असल्याचं वेदचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी म्हटले आहे. टाटाची टीम नागपूर आत पाहण्यासाठी आली तर त्यांना आम्ही मदत करू असेही प्रदीप माहेश्वरी म्हणाले.