अकोला: स्वपक्षीयांवर तोफ डागून भाजपला आणि खासदारकीला रामराम ठोकणाऱ्या नाना पटोले यांच्यानंतर आता भाजपमध्ये दुसरं बंड होण्याची शक्यता आहे. अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांनी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर रणजीत पाटील यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा 15 दिवसांत आपली भूमिका जाहीर करु, असा इशारा खासदार संजय धोत्रे यांनी दिला.
रणजीत पाटील यांनी सत्तेचा दुरुपयोग करुन अकोल्याचा बिहार केल्याचा आरोप खासदार धोत्रे यांनी केला.
पाटील आणि धोत्रे यांच्या वादाला तोंड फुटलंय ते पाटील यांच्या घुंगशी गावातील ग्रामपंचायत निवडणूक निकालामुळे. या निवडणुकीत पाटील यांच्या गटाचा मोठा पराभव झाला.
या निवडणुकीत सरपंचपदासह सातही जागांवर काटे-देशमुख गटाचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. मात्र या गावात पाटील यांच्या लोकांनी दहशत निर्माण केल्याचा आरोप धोत्रे यांनी केला. २६ तारखेला पाटील गटाच्या हल्ल्यात हिम्मत देशमुख यांचं बोट तुटलं होतं. मात्र याप्रकरणी अद्यापही गुन्हे दाखल झाले नसल्यानं धोत्रे यांच्यासह भाजपच्या दोन आमदारांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेतली.
अकोला जिल्हा भाजपात खासदार संजय धोत्रे आणि पालकमंत्री डॉ रणजीत पाटील यांचे दोन गट आहेत. गेल्या तीन वर्षांपासून दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी सोडत नाही. आज खासदार संजय धोत्रे यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे.
आतापर्यंत आपण शांत बसलो, मात्र आता थेट मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या न्यायालयात दाद मागितल्याचे धोत्रे म्हणाले. आता अकोला भाजपातील संघर्ष पुढच्या काही दिवसांत आणखी तीव्र होणाची शक्यता आहे.
रणजीत पाटलांना हाकला, भाजप खासदार संजय धोत्रेंची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Mar 2018 05:55 PM (IST)
रणजीत पाटील यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा 15 दिवसांत आपली भूमिका जाहीर करु, असा इशारा खासदार संजय धोत्रे यांनी दिला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -