ठाणे : चिपळूण येथील तिवरे धरण फुटल्याच्या दुर्घटनेत 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या धरणफुटीवरुन सध्या राज्यात मोठं राजकारण सुरु आहे. खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे तिवरे धरण फुटलं, असं ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांचं मत असल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला. त्यामुळे सावंतांवर सर्व स्तरातून टीका होत आहे.


तानाजी सावंतांच्या खेकड्यांबाबतच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड चक्क खेकडे घेऊन नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले. खेकड्यांना पोलिसांच्या ताब्यात देत आव्हाडांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, जलसंधारण मंत्री तानाजी सावंत हे स्थानिक आमदाराचा बचाव करत आहेत. स्वत:च्या भष्ट्राचाराचं खापर खेकड्यांवर फोडण्याचं काम सुरु असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.

व्हिडीओ पाहा



चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण हेच तिवरे धरणाचे ठेकेदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. या आरोपांनंतर तानाजी सावंत यांनी दुर्घटनेचे खापर खेकड्यांवर फोडून सदानंद चव्हाणांची पाठराखण केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून होत आहे.

खेकड्यांनी भोकं पाडल्यानं तिवरे धरण फुटलं, मंत्री तानाजी सावंतांचा अजब दावा | एबीपी माझा



याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. चव्हाण म्हणाले की, पूर्वी उंदिर हा भाजप सरकारमधील महत्त्वाचा घटक होता. आता त्यामध्ये खेकडेदेखील आहेत. खेकडे आणि उंदिर आता भाजपला वाचवायला निघाले आहेत.

चव्हाण म्हणाले की, चिपळूणमधील दुर्घटनाग्रस्त तिवरे धरण कोणी बांधलं आहे? त्याचा कंत्राटदार कोण होता? त्या धरणाची पाहणी कोणी केली? धरणाची दुरुस्ती कोणी केली? याबाबत सरकारने श्वेतपत्रिका जाहीर करायला हवी.


तिवरे धरणफुटीत आतापर्यंत 20 जणांचे मृतदेह हाती, 4 ग्रामस्थ अद्यापही बेपत्ता | एबीपी माझा