औरंगाबाद : औरंगाबादमध्ये गुप्ती, तलवारी, चाकू सारख्या धारदार शस्त्रांची ऑनलाईन शॉपिंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. फ्लिपकार्टद्वारे शस्त्र मागवणाऱ्या चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
औरंगाबादच्या क्राईम ब्रँच पथकाने काल रात्री इस्टाकोर्ट सर्व्हिस प्रा. लि. या कुरिअर कंपनीच्या नागेश्वरवाडी आणि सिडोका भागातील गोदामावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी 12 तलवारी, 13 चाकू, एक गुप्ती, एक कुकरी अशी शस्त्रं जप्त केली.
खेळण्यांच्या नावावर थेट अमृतसरहून ही शस्त्रे मागवण्यात आल्याचं समोर आलं आहे. पोलिसांना संशयास्पद वाटलेली सहा पार्सल तपासली असता त्यात धारदार शस्त्रं असल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी नावेद खान, सागर पाडसवान, चंदू लाखुलकर, मुकेश पाचवणे यांना ताब्यात घेतलं आहे. आणखी तिघांचा शोध सुरु आहे.
शहरात अगदी काही दिवसांपूर्वी हिंसाचार झाला होता, त्या पार्श्वभूमीवर तर ही शस्त्रं मागवली नाहीत ना, याचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी क्रांतीचौक आणि मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.