Swabhimani Shetkari Sanghatana : पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक असतात. मात्र, हे पालकमंत्री जिल्ह्याला कुपोषित ठेवत आहेत. आमचा डोळा पालकमंत्र्यांच्या पदावर नाहीतर आमचा डोळा पाण्यावर आहे. आम्हाला आमच्या हक्काचे पाणी दिसत असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रवक्ते रणजित बागल यांनी दिली आहे. प्रसंगी रक्त सांडू पण हक्काचं एक थेंबही जावू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. लाकडी निंबोडी योजनेंतर्गत उजणीचे पाणी नेण्यास विरोध आहे. त्यामुळं आज पंढरपूर तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपरी याठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.




भरणे मामांना शेतकरी हिसका दाखवतील


पालकमंत्र्यांकडून जिल्ह्याचा अपेक्षाभंग झाला आहे. भरणे मामांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गोड बोलून 'मामा' बनवण्याचे काम केलं आहे. त्यांना जिल्ह्यातील शेतकरी निश्चित हिसका दाखवतील असा विश्वास देखील  यावेळी व्यक्त केला. उजणीचे पाणी देण्यास आमचा कडाडून विरोध आहे. याविरोधात सोलापूरचे शेतकरी पेटून उठले आहेत. त्यांचा आवाज म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे. त्वरीत सरकारने हा निर्णय स्थगित करावा अन्यथा येणाऱ्या काळात आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिली आहे. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल, तालुकाध्यक्ष सचिन पाटील यासह मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते.




काय आहे ही योजना


राज्य सरकारने लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या माध्यमातून उजणी धरणातून इंदापूर आणि बारामती तालुक्याला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून इंदापूर आणि बारामती तालुक्यातील एकूण 17 गावासाठी पाणी पुरवठा केला जाणार आहे. या सिंचन योजनेमुळे 7 हजार 250 हेक्टर अवर्षणप्रवण शेती क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. यासाठी जवळपास 0.90 अब्ज घनफूट पाणी उपसा करणे प्रस्तावित आहे. या योजनेसाठी 348 कोटी 11 लाख रुपयांच्या अंदाजपत्रक किंमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र या योजनेस सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि काही राजकीय लोकांचा विरोध आहे.


महत्वाच्या बातम्या: