कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वरुड-मोर्शीचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांच्या हकालपट्टीचा ठराव राज्य कार्यकारणीच्या बैठकीत एकमताने पारित करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये हा ठराव पारित करण्यात आल्याने देवेंद्र भुयार यांच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
अमरावती जिल्ह्यातील हिवरखेड येथे 24 मार्च रोजी आयोजित मेळाव्यात आमदार देवेंद्र भुयार यांच्या हकालपट्टीची घोषणा करण्यात आली होती. विदर्भ स्वाभिमानीचे अध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनी आमदार देवेंद्र भुयार यांची संघटनेतून हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव दिला होता.
दरम्यान, मला विश्वासात घेतलं तर आपण स्वाभिमानी सोबत असू, नाही घेतलं तर त्यांच्या शिवाय असं सांगत सध्या फक्त इंटर्व्हल झाला असून, पिक्चर अभी बाकी है ! असा सूचक इशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी दिला होता. त्यामुळे देवेंद्र भुयार आता कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काय म्हणाले होते राजू शेट्टी?
अमरावती जिल्ह्यातील वरूड मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या संदर्भात कार्यकर्त्यांच्या काय भावना आहे हे जाणून घेऊन त्यांच्याबद्दलचा निर्णय घेऊ. ते पक्षासाठी सक्रिय नाही अशी कार्यकर्त्यांच्या भावना असून त्यांची भूमिका जाणून घेऊ असं राजू शेट्टी म्हणाले होते. आमदार भुयारबद्दल त्यांच्या काय तक्रारी आहेत हे जाणून घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असंही शेट्टी म्हणाले होते.
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय
आज झालेल्या स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. सध्या भाजपसोबत जाण्याचा कोणताही विचार नसून एकला चलो रे ही भूमिका असल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या: