Raju Shetti on CM Uddhav Thackeray : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर टोला लगावला. 'दादा राज्य तुम्ही चालवता, मुख्यमंत्री कधी कधी दिसतात' असं वक्तव्य राजू शेट्टींनी केलं. बारामती तालुक्यातील निंबुत गावात विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी आयोजीत कार्यक्रमात शेट्टी बोलत होते.


यावेळी बोलताना राजू शेट्टींनी दूध व्यवसायाबद्दल प्रतिक्रिया दिली. दूध भेसळीबाबत कडक धोरण करण्याची गरज आहे. दुधाचा व्यवसाय अडचणीत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीत दूध विकावं लागलं. त्यामुळं शेतकऱ्यांना गाई विकाव्या लागल्या. त्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत. दुधाचे दर वाढले आहेत. लॉकडाऊन काळात दुधाचे दर कमी झाले होते. त्यामुळं गाई कमी झाल्या. त्यामुळं सरकारनं आता दूध खरेदीत सहभाग घ्यावा, अन्यथा आपलं राज्य दूध उत्पादनात मागे पडेल असे मतही राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं.


अनेक विद्यार्थ्यांना फी वाचून अर्धवट शिक्षण सोडावं लागलं. ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडलं त्यांचा शोध घेऊन सरकारनं त्याचं शिक्षण पूर्ण करावं असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले. दरम्यान, महाविकास आघाडीच्या कामाबाबत मंथन केलं जाईल. शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी निर्माण झाली. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केल हा प्रश्न आहे? उसाच्या एफआरपी चा मुद्दा असेल, भूसंपादनाचे कायदे असतील हे सरकारने निर्णय घेतले आहेत. त्यावर मंथन केलं जाईल आणि त्यांनंतर महाविकास आघाडीसोबत राहायचं की नाही ते ठवरल जाईल, असेही राजू शेट्टींनी यावेळी सांगितले.


मी 11 फेब्रुवारीला शरद पवार यांना पत्र दिले होते. त्याच उत्तर मला अद्याप मिळालेलं नाही असेही राजू शेट्टींनी यावेळी सांगितलं. महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष, लोकभारती व इतर छोटे-मोठे पक्ष यांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते आजकाल कवडीचीही किंमत देत नाहीत. वैचारिक बांधिलकीमुळं हे छोटे पक्ष भाजपला पाठिंबाही देऊ शकत नाहीत व तिसरी आघाडीही करु शकत नाहीत. या त्यांच्या आगतिकतेचा गैरफायदा घेऊन महाविकास आघाडीतील मोठे पक्ष त्यांना गृहित धरत आहेत. शेतकरी व सर्वसामान्यांच्या विश्वासाला तडा जाईल, असे अनेक निर्णय राज्य सरकारनं घेतले आहेत. यात वेळीच बदल केले नाहीत तर सत्तेचा डोलारा कोसळण्यास वेळ लागणार नाही. अशा अनेक मुद्द्यांचा उल्लेख करणारे पत्र  राजू शेट्टींनी शरद पवार यांना लिहले होते. मात्र, त्याचे उत्तर अद्याप मिळाले नसल्याचे शेट्टी म्हणाले.


दरम्यान, सागलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरुन देखील राजू शेट्टींना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी बोलण्यास नकार दिला. राष्ट्र पुरुषांच्या बाबतीत राजकारण करु नये. मला यामध्ये पडायचं नाही, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली.