परभणी : खते, बी बियाणे आणि औषधी कंपन्यांना फायदा पोहोचवून देण्यासाठी पॅकेज घेऊन हवामान खात्याने राज्यासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे. यावरच न थांबता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विभागीय अध्यक्ष माणिक कदम यांनी हवामान खात्याच्या संचालकांविरोधात 420 चा गुन्हा दाखल करण्यासाठी परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिला आहे.

2018 सालच्या पावसाळ्यामध्ये मराठवाड्यासह राज्यभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. त्यामध्ये राज्यातील सर्वच मंडळांमध्ये हा पाऊस होईल, हा अंदाज वर्तवण्यात आला आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणीची तयारी केली. त्यासाठी खते बी बियाणे आणि फवारणीची औषधे मोठ्या प्रमाणात विकत घेतली. यातून खाजगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे.

जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये दहा दिवसांपेक्षा जास्त काळ कोरडा गेला. त्यामुळे हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला असून, केवळ बाजारात उलाढाल व्हावी, या हेतूने हवामान खात्याने हा अंदाज दिला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज देण्यात आला असून, हवामान संचालकविरोधात 420 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय.

परभणी ग्रामीण पोलिसांनी हा अर्ज स्वीकारला असून, चौकशी करुन योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहे आणि त्यामुळे हवामान खात्यावर करण्यात आलेले हे आरोप गंभीर आहेत.