परळी : मराठा क्रांती मोर्चाचं परळीतील ठिय्या आंदोलन 30 नोब्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात गेल्या 21 दिवसांपासून हे ठिय्या आंदोलन सुरु होते. अखेर आज ठिय्या आंदोलन स्थगित करण्याची घोषणा समन्वयक आबा पाटील यांनी केली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळीत ठिय्या आंदोलन सरु केले होते. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील हे या ठिय्या आंदोलनाचे नेतृत्त्व करत होते.

मात्र, परळीतीलच मराठा क्रांती मोर्चाच्या काही सदस्यांचा ठिय्या आंदोलन स्थगित करण्यास विरोध असल्याचेही दिसते आहे.

मराठा आरक्षणावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत परळी आंदोलनाचे केंद्र असेल आणि सरकारने इथेच येऊन चर्चा करावी. इतर ठिकाणच्या मराठा कार्यकर्त्यांशी चर्चा करत असेल तर आम्हास ते मान्य होणार नाही. जी चर्चा करावयाची आहे, ती येथूनच होईल, असे स्पष्ट मत परळीत या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी मांडण्यात आली होती.

परळीतील ठिय्या आंदोलनाच्या मागण्या कोणत्या होत्या?

  • राज्य सरकार करत असलेली मेगाभरती स्थगित करावी. मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय भरती करु नये.

  • अशा प्रकारचे आश्वासन सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी लेखी द्यावे.

  • कोपर्डी घटनेतील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्यात यावी.


दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाशी संवाद साधत, मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार असल्याचे सांगितले. तोपर्यंत मेगाभरतीही स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि परळीतील ठिय्या आंदोलनाचे नेते आबा पाटील यांनी स्वागत केले होते. त्यानंतर आज ठिय्या आंदोलन नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्याची घोषणा आबा पाटील यांनी केली आहे.

VIDEO : ठिय्या आंदोलनाबाबत समन्वयक आबा पाटील नेमकं काय म्हणाले?