कोल्हापूर : हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीची कोल्हापुरात तोडफोड करण्यात आली. माजी मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालकीच्या कारखान्याची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची तोडफोड स्वाभिमानी संघटनेकडून करण्यात आली.


कागल येथील संताजी घोरपडे कारखान्याची ऊसवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची परिते येथे तोडफोड करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गाडीची हवा सोडली. हा कारखाना माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मालकीचा आहे. आक्रमक झालेल्या स्वाभिमानीनं या कारखान्याची ऊस वाहतूक बंद पाडली आहे.

आज 16 वी ऊस परिषद कोल्हापूरमध्ये सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

ऊसाचा दर जाहीर करायला हा काय मटक्याच्या आकडा आहे का? सदाभाऊ खोत

ऊस दर नेमका कोण जाहीर करणार या प्रश्नावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे पत्रकारांवर भडकले. ऊसाचा दर जाहीर करायला हा काय रतन खत्री याचा मटक्याच्या आकडा आहे का? असा प्रतिप्रश्न सदाभाऊ खोत यांनी विचारला.

ऊस दराचा प्रश्न मिटावा यासाठी राज्यसरकार येत्या काही दिवसात साखर कारखानदार, विविध शेतकरी संघटना यांची एकत्र बैठक घेणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं. तसंच ऊस परिषदेबाबत राजू शेट्टी यांचं नाव न घेता टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस आंदोलन चिघळलं

थकित बिल न दिल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातल्या आसुर्लेच्या दत्त साखर कारखान्यामध्ये तुफान तोडफोड केली. तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांचे थकित बिल दिले जात नाही, तोपर्यंत कारखाना चालू देणार नसल्याचा इशाराही दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ऊस गाळप हंगाम जवळ आला आहे. मात्र, कोल्हापुरातील काही शेतकऱ्यांना मागील थकीत बिल अद्याप मिळालेलं नाही. तसेच गेल्यावर्षी शेतकऱ्यांना टनामागे दोन किलो साखर देण्याऐवजी 1 किलो साखर देण्यात आली. त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कारखाना प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गेले होते.

पण यावेळी प्रशासनाच्या वतीने एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने शेतकरी आक्रमक झाले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी साखर कारखान्याची तोडफोड केली. अकाऊंट ऑफिस, शेती ऑफिस, संगणक ऑफिस यासह अन्य केबिन्सची तोडफोड केली.

तसेच, जोपर्यंत थकित बिलं दिलं जात नाही, तोपर्यंत कारखाना सुरु करु दिला जाणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. यावेळी कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली.