बुलढाणा : सहसा सरत्या वर्षाला निरोप देत असताना या वर्षाच्या अखेरच्या दिवशी, म्हणजेच 31डिसेंबरला बहुविध प्रकारे हा दिवस साजरा करण्याला अनेकांचं प्राधान्य. कोणी या दिवसासाठी शहराबाहेरची वाट धरतं, तर कोणी मित्रमंडळींसमवेत हा दिवस साजरा करण्याला प्राधान्य देतं. यात अगदी नेतेमंडळीही मागे नाहीत. अशाच एका नेत्याची थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनची धमाल सध्या चर्चेत आहे. त्यामागं कारणंही तसंच.


शेतकऱ्यांना नवीन वर्ष काय आणि जुनं वर्ष काय सर्व सारखंच. कारण शेतकऱ्यांची परिस्थिती वर्षानुवर्षे सारखीच आहे. पण, तरीही आपल्या पोशिंद्यालाही तितकंच महत्त्वं देत सगळीकडे नवीन वर्षाचे स्वागत होत असतांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आगळा वेगळा 31 st साजरा केला.


बुलढाणा जिल्ह्यातील नांद्राकोळी गावात श्रीकृष्ण काळवाघे यांच्या शेतात रात्री गव्हाला पाणी देवून परिसरातील शेतकऱ्यांसोबत रात्र घालवली. शेतकऱ्यांसोबत चटणी - भाकर खावून जेवण केले. यावेळी तुपकरांमधील शेतकरी बघायला मिळाला. स्वतः तुपकरांनी शेतात उतरून पिकाला पाणी देण्याचे काम केले.


CBSE Exams Date 2021 | सीबीएसई परीक्षांच्या तारखा जाहीर


इतर उद्योगांना पूर्णवेळ वीज, पाणी मिळते व पायाभूत सुविधा मिळतात. पण शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा तर सोडाच साधी पूर्ण वेळ वीजही मिळत नाही. मिळते ती तर रात्री फक्त 8 तासच..! जंगली जनावरे, साप-विंचू काट्याची पर्वा न करता शेतकरी अन्नधान्य निर्मितीचे काम करतो..अंबानी-अदानी ला वेगळा न्याय आणि शेतकऱ्यांना वेगळा न्याय का..? असा सवाल उपस्थित करत तुपकरांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. नवीन वर्षात तरी केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत अशी मागणी करत शेतकऱ्यांचं माणूस म्हणून जगणं सरकारने मान्य केले पाहिजे, अशी अपेक्षा तुपकरांनी व्यक्त केली.