कोरेगाव भीमा : अर्थव्यवस्था बदलण्यासाठी सरकारकडे प्लॅन नाही, सरकार फक्त आदेश काढण्याचे काम करत आहे, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. आज सकाळी त्यांनी कोरेगाव भीमा मधील विजय स्तंभाला आज सकाळी अभिवादन केलं. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एक जानेवारी हा या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस आहे असं आम्ही मानतो. पेशवाईच्या काळात जी अस्पृश्यता पाळली जात होती त्या विरोधातील हा लढा होता. हा लढा यशस्वी झाला. तेव्हापासून सुरू झालेली ही सोशल मुव्हमेंट खऱ्या अर्थाने जोपर्यंत लोकशाही येत नाही तोपर्यंत कायम राहील, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.


दोन्ही सरकारकडे निर्णयक्षमता नाही


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था कशी सुधारायची याचा प्लॅन नाही. लोक ठरवतायत काय करायचं ते. सरकार स्वतः काहीही करत नाही. मुंबई लोकल आतापर्यंत सुरू व्हायला हवी होती. दोन्ही सरकारकडे निर्णयक्षमता नाही, असंही ते म्हणाले.


यल्गार परिषदेबाबत बोलताना ते म्हणाले की, कोळसे पाटलांना यल्गार परिषद घ्यायची असेल तर त्यांनी घ्यावी. मला आणि न्यायमूर्ती पी बी सावंतांना जी घ्यायची होती ती आम्ही घेतली आणि त्याचा उद्देश देखील साध्य झाला, असं ते म्हणाले.


कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊन देणार नाही : अजित पवार
कोरेगाव भीमा लढाईत सैनिकांनी त्यावेळी जे शौर्य दाखवलं त्याचा आम्हाला आजही अभिमान आहे. कोरेगाव भीमा ठिकाणाचा विकास आराखडा मंजुर करा अशी मागणी आहे. कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊन देणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून कोरेगाव भीमा मधील विजय स्तंभाला अभिवादन केलं. अजित पवार म्हणाले की, सैनिकांनी त्यावेळी जे शौर्य दाखवलं त्याचा आम्हाला अभिमान आहे. कोरेगाव भीमा ठिकाणाचा विकास आराखडा मंजुर करा अशी मागणी आहे. या स्तंभाच्या जवळच्या जागा ताब्यात घेण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. या जागा खाजगी मालकीच्या आहेत. त्या जागा मालकांना योग्य तो मोबदला दिला जाईल आणि या जागा ताब्यात घेतल्या जातील. मी पालकमंत्री आहे आणि अर्थमंत्री देखील आहे. या विकास आरखड्यासाठी आर्थिक बाजू देखील योग्य प्रकारे सांभाळली जाईल. त्यामध्ये कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही याची ग्वाही देतो, असं अजित पवार म्हणाले