Buldhana News बुलडाणा :  शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Farmers Sanghatna) स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्याचा ठरवलं होतं. आज खामगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा निघणार होता.  तसेच या नियोजित मोर्च्यानंतर राजू शेट्टी हे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचा संवाद मेळावा घेणार होते, मात्र आज या मोर्चाला अपेक्षित कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची संख्या नसल्याने हा मोर्चा आणि संवाद मेळावा रद्द करण्याची वेळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर आली आहे.


स्वाभिमानचे सर्वेसर्वा राजू शेट्टी करणार होते नेतृत्व 


खरंतर बुलढाणा जिल्हा हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा गड मानल्या जात होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानीचे माजी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांना स्वाभिमान पक्षाने  संघटनेतून काढल्यानंतर कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनीही या मोर्चाकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे. खरंतर रविकांत तुपकर यांची हकालपट्टी केल्यानंतर राजू शेट्टी यांचा बुलढाण्यातील हा पहिलाच दौरा होता. मात्र, अशा पद्धतीने कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनीच या मेळाव्याकडे आणि मोर्चाकडे पाठ फिरवल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर मोर्चा व संवाद मेळावा रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे.


स्वाभिमानीने नातं तोडल्यानंतर रविकांत तुपकरांनी काढला नवा पक्ष


शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हाकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात भूमिका घेऊन संघटनेची हानी केल्याबद्दल रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सांगण्यात आलंय. त्यानंतर रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी पुण्यात महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची घोषणा केली होती. तर आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रविकांत तुपकर 25 जागा लढवणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पुण्यातील कार्यकर्ता बैठकीत रविकांत तुपकरांनी (Ravikant Tupkar) ही घोषणा केली होती. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात ते 6 जागा लढवणार आहेत. तर लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार असल्याची माहिती त्यावेळी त्यांनी दिली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या