Sangli Crime : सोशल मीडिया स्टार गौतमी पाटीलच्या मिरज तालुक्यातील बेडगमधील लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांनी हैदोस घातल्याचे समोर आल्यानंतर आता याच कार्यक्रम झालेल्या परिसरात एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनेक तर्क लावले जात असताना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.    


गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचा झेडपीच्या शाळेवर ठेका 


मिरज तालुक्यातील बेडग इथल्या जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे पटांगणात लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या लावणी कार्यक्रमात इतकी गर्दी जमली की मैदान कमी पडले. मग काही प्रेक्षकांनी जिल्हा परिषद शाळेच्या छतावर चढून कार्यक्रम पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र यात जिल्हा परिषद शाळेच्या कौलारु छताचा चुराडा झाला. शाळेच्या झालेल्या या नुकसानीला कोण जबाबदार असा सवाल आता ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. झाडांवर प्रेक्षक बसल्याने अनेक झाडे देखील मोडली.


कार्यक्रमात नेमकं काय घडलं?


बेडगमधील एका मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या आणि बेडग गावचे नाव देशात गाजवणार्‍या मानकऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. नृत्याचा कार्यक्रम सुरु झाला. तिचं नृत्य पाहण्यासाठी जिल्ह्यातून आणि बाहेरुन तिचे चाहते आले होते. कार्यक्रमावेळी शाळेच्या पटांगणात तुफान गर्दी झाल्याने काही प्रेक्षक हे शाळेच्या कौलारु छतावर जाऊन नृत्याचा ताल धरु लागल्याने कौलांचा चुराडा झाला. तार जाळीच्या कम्पाऊंडचेही मोठं नुकसान झालं. 


कोण आहे गौतमी पाटील?


गौतमी पाटील ही सोशल मीडियावर ओळखीचा आणि प्रसिद्ध चेहरा आहे. आपला डान्स आणि एक्स्प्रेशन्सने गौतमीने तरुणाईला वेड लावलं आहे. 26 वर्षीय गौतमी ही डान्सर असून लावणी डान्सर म्हणून तिला ओळखलं जातं. यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवरतिचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. इतकंच काय तर अनेक कार्यक्रमांमध्ये गौतमीला डान्स करण्यासाठी बोलवलं जातं आणि त्यासाठी तिला मानधन दिलं जातं. दरम्यान काही दिवसांपूर्वी व्हिडीओमधील डान्स स्टेप्समुळे गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली. सार्वजनिक कार्यक्रमात डान्स करताना गौतमीने आक्षेपार्ह डान्स स्टेप्स केल्या, ज्यामुळे गौतमीला माफी मागावी लागली होती.


इतर महत्वाच्या बातम्या