Wardha News वर्धा : निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीची नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये निम्न पैनगंगा प्रकल्प धरणाच्या सर्व कामांना स्थगिती देण्यात आल्याचा दावा धरणविरोधी संघर्ष समितीने केला आहे. किनवट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार भीमराव केराम यांच्या पत्रानुसार मुंबई येथे बैठक बोलावली होती. या बैठकीला उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार नामदेव ससाने आणि आर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉ. संदीप धुर्वे उपस्थित होते. यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. 


निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या मागणीला यश 


राज्याच्या मराठवाडा आणि विदर्भाच्या 95 गावातील दीड लाख लोकांना विस्थापित करणाऱ्या निम्न पैनगंगा प्रकल्पाला निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समिती विदर्भ, मराठवाड्याच्या वतीने गेल्या सत्तावीस वर्षापासून सतत विरोध केला आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये या प्रकल्पात कोणतेही गावे न बुडविता प्रकल्प कसा निर्माण करता येईल, लोकांना पाणी कसे देता येईल याचा अभ्यास करून अहवाल कळवावा,  तसेच चालू असलेले धरणाचे सर्व प्रकारचे काम बंद करा, अशा सूचना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी संबंधित विभागाला दिल्याचे समितीने सांगितले आहे.


प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती


किनवट तालुक्यातील खंबाळा आणि आर्णी तालुक्यातील खडका या मुख्य भिंतीच्या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहणार होता. तिन्ही विधानसभा मतदारसंघात राज्य शासनाविरुद्ध असंतोष आणि खदखदत असल्याचे एका सर्वे मधून पुढे आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी याबाबतची दखल घेत मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन या प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती दिलीय. तसेच बुडीत क्षेत्रातील जनतेला एक प्रकारे दिलासा दिल्याचे समितीने सांगितले आहे.


निम्न पैनगंगा प्रकल्प परिसरातील गावकऱ्यांना कोणत्याही समस्या येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. प्रकल्प उभारताना गावे बाधित न करता पाणी साठवणीच्या विविध उपाययोजना सुचवाव्यात. तसेच त्यासंदर्भात अहवाल सादर करावा. अंतिम निर्णय होईपर्यंत प्रकल्प कामाची कार्यवाही करू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.नुकतेच  विधानभवन येथे यवतमाळ जिल्ह्यातील निम्न पैनगंगा प्रकल्पासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी आमदार डॉ. संदीप धुर्वे, नामदेव ससाणे, भीमराव केराम, विभागाचे अधिकारी, पैनगंगा प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.


पर्यायी मार्गाबाबत सकारात्मक विचार करावा- देवेंद्र फडणवीस


यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पैनगंगा प्रकल्प उभारणे आणि उपसा सिंचनाने होणारे फायदे यासाठी पर्यायी मार्गाबाबत सकारात्मक विचार करावा. गावांना बाधित न करता कोणत्या पद्धतीने पाणी अडवता येईल यासाठी सर्वोतोपरी विचार करून अहवाल सादर करावा. विविध उपाययोजनांचा अभ्यास करून अंतिम निर्णय होईपर्यंत तसेच जनतेला कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही न करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.भविष्यात उद्भवणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा विचार करून स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सकारात्मक निर्णय करावा, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.


इतर महत्वाच्या बातम्या