Dr. Sudhir Tambe from Congress party nashik graduate constituency News:  नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik News Updates) उमेदवारीवरुन आता राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने ही कारवाई केली असल्याचं पत्र जारी करण्यात आलं आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबित असणार आहेत. 


नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी (Nashik padvidhar election) सुधीर तांबे यांची  अधिकृत घोषणा झाल्यानंतरही त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने (Maharashtra Congress) हाय कमांडला दिली होती. तसेच कारवाईचीही मागणी केली होती. यावरुन हायकमांडनं सुधीर तांबेंना निलंबित केलं आहे. 




 


आता काहीच बोलणार नाही- सुधीर तांबे


निलंबनाच्या कारवाईनंतर डॉ.सुधीर तांबे यांनी म्हटलं आहे की, आम्ही 18 जानेवारीला भूमिका स्पष्ट आहोत. आता यावर काहीच बोलणार नाही. आम्ही निवडणूक प्रचारात व्यस्त आहोत. आमची भूमिका आम्ही मांडणार पण योग्य वेळी, असंही तांहे म्हणाले. काय घडामोडी होतात यापेक्षा निवडणूक महत्वाची आहे, असंही ते म्हणाले.  


माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे, असं ट्वीट सुधीर तांबे यांनी केलं आहे. 






प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कालच म्हटलं होतं की, सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांना कॉंग्रेसचा पाठिंबा नाही. आम्ही सत्यजीत तांबे यांच्या तोडीस तोड उमेदवार देऊ. सोमवारी 16 जानेवारीला ते कळेलच असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले होते..  


सलग तीन वेळा नाशिक पदवीधर मतदारसंघातून आमदार राहिलेले डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेस पक्षाने बाहेरचा रस्ता दाखविला. नाशिक पदवीधर मतदारसंघात दावेदार उमेदवार म्हणून नाव असलेल्या सुधीर तांबे यांना बिंनदिकतपणे काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली. मात्र ऐनवेळी पक्षाच्या भूमिकेला छेद देत तांबे आणि पुत्र सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि सगळे राजकीय गणितच फिरलं. 


डॉ. सुधीर तांबे यांची राजकीय पार्श्वभूमी बघितली असता 2009 मध्ये प्रताप सोनवणे लोकसभेत गेल्यानंतर रिक्त झालेल्या नाशिकच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सुधीर तांबे यांना उमेदवारी मिळाली, अन् विजय मिळविला होता. अवघ्या 11 महिन्यांच्या काळात त्यांनी केलेल्या कामांमुळे 2010 मध्ये 34 हजार 390 मतांच्या फरकाने त्यांना विजय मिळाला. तर 2017 मध्ये, ते 42,825 अशा सर्वाधिक मतांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. विशेष म्हणजे ते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे डॉ. तांबे मेव्हणे आहेत. 


दरम्यान एवढं सगळं असताना नाशिक पदवीधर मतदार संघात त्यांचा विजयी निश्चित मानला जात असताना ऐनवेळी पक्षाचा आदेश झुगारून त्यांनी पुत्र सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि तिथूनच पाल चुकचुकली काँग्रेसने देखील पाठिंबा देणार नसल्याचं सांगितलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हायकमांडकडे कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगितल्यानंतर आज डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे सद्यस्थितीत नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले सत्यजित तांबे हे अडचणीत सापडले आहेत.


ही बातमी देखील वाचा


Nashik Graduate Constituency : 'आमच्याकडे तांबेंच्या तोडीचा उमेदवार, नाव सोमवारी सांगू...', नाना पटोले स्पष्टच बोलले...