Makar Sankranti 2023  : राज्यभरात आज मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. विशेष करून महिला वर्गाने तीळगूळ वाटत करून संक्रातीचा सण साजरा केला. मकर संक्रात हा सण महिला सौभाग्याचं लेण लेऊन साजरा करतात.  आपापसात गोडवा निर्माण व्हावा म्हणून तीळगूळ वाटप केले जातात. मकर संक्रातीला विधवा महिलांना देखील तेवढाच सन्मान मिळावा म्हणून बीडमध्ये मकर संक्रात कुंकवा पलीकडची या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं आहे. 


बीडच्या काकडहिरा गावात विधवा महिलांच्या सन्मानासाठी अनोख्या पद्धीतीने मकरसंक्रातीचा सण साजरा करण्यात आला. बीडच्या प्रतिभा हावळे आणि मनीषा जायभाये या दोघी मैत्रिणी गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळ्या गावात संक्रातीच्या सणानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करतात. आजच्या कार्यक्रमात शंभरहून अधिक विधवा महिलांना साडीचोळीचं वाटप करण्यात आलं. 
 


दौंड तालुक्यातील केडगाव येथे ऊसतोड महिलांना साड्या वाटप


मकर संक्रातीचे औचित्य साधून दौंड तालुक्यातील केडगाव परिसरातील ऊसतोड महिला कामगारांना साड्या वाटप करण्यात आल्या आहेत. मागील तीन ते चार दिवसांपूर्वी व्हाट्सअप ग्रुपच्या मार्फत मदतीचे आव्हान केल्यानंतर श्री स्वामी समर्थ मठ बावीस फाटा आणि केडगाव हेल्प सेंटर या व्हाट्सअप  ग्रुपच्या माध्यमातून भरघोस मदत गोळा झाली. त्यानंतर शेताच्या बांधावर जाऊन ऊसतोड महिला कामगारांना जवळपास 200 साड्या वाटप करण्यात आल्यात.  
 


नागपुरात पतंगोत्सव 


मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज नागपुरात पतंगोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. नागपूर शहरातील प्रत्येक भागात आणि मोठ्या इमारतींच्या गच्चीवर सर्व रहिवाशांनी एकत्रितपणे पतंगबाजीचा आनंद लुटला. मकर संक्रांतीच्या निमित्ताने जानेवारी महिन्यात नागपुरात मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी केली जाते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्ष लोकांच्या सामूहिक पतंगबाजीवर काही निर्बंध होते. मात्र, यंदा मोकळ्या वातावरणात उत्साहाने संक्रांत आणि पतंगोत्सव साजरा करण्यात आला. खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांची पतंग कापल्यानंतर "ओ काट" चा आवाज सर्वत्र घुमत आहे. 
 


नाशिकच्या रामकुंडावर गर्दी


मकरसंक्रांतचा मुहूर्त साधत नाशिकच्या रामकुंडावर अगदी सकाळपासूनच गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी महिला आणि पुरुषांची अक्षरशः झुंबड उडाल्याचं चित्र बघायला मिळालं. रामकुंड, गांधी तलाव तसेच दुतोंड्या मारुती परिसरातही भाविकांनी डुबकी घेतली.  परराज्यातूनही लाखो भाविकांनी रामकुंडावर हजेरी लावली. आज सूर्याचा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होत असतो. आजच्या तिथीपासून सूर्य दक्षिणायनपासून उत्तरायण होत असतो. त्यामुळे आज सुर्यास्तापासून ते सुर्योदयापर्यंत गोदावरी नदीत स्नान करणे शुभ मानले जाते. 


महसूलमंत्र्यांनी दिल्या उपमुख्यमंत्र्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिर्डीहून हेलिकॉप्टरने बीडकडे रवाना होण्यापूर्वी शिर्डी विमानतळावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांची  भेट घेतली. यावेळी तीळगूळ देऊन विखे पाटलांनी फडणवीसांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. 


शिंदे गटाचे आणदार आणि शिवसेनेच्या महापौर पतंगोत्सवासाठी एकत्र 


मकर संक्रांती निमित्ताने आज जळगाव मधील एल के फाऊंडेशनच्या माध्यमातून पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजप आमदार सुरेश भोळे आणि उद्धव ठाकरे गटाच्या महापौर जयश्री महाजन देखील या महोत्सवात सहभागी झाले होते. इतरवेळी एकमेकांच्या विरोधात उभे राहून आरोप प्रत्यारोप करणारे आमदार सुरेश भोळे आणि जयश्री महाजन यांना एकत्र पतंग उडविताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.