Suresh Prabhu : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेतला आहे. यापुढे निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा प्रभू यांनी कणकवलीमध्ये झालेल्या व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात केली. यापुढे पर्यावरणाचं काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.


लोकसभेत राजापूर मतदारसंघाचं सलग चारवेळा प्रतिनिधित्व केलेले, अटलबिहारी वाजपेयी आणि मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद भूषवलेले सुरेश प्रभू सध्या राजकारणापासून दूर असल्याचं दिसत होतं. मोदी सरकारच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. त्यानंतर यापुढे राजकारण विरहित प्रश्न सोडवायचे आहेत असं सांगत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणाला रामराम ठोकला आहे.


मी 2014 मध्ये लोकसभा निवडणुक लढविली नव्हती, तशीच यापुढेही निवडणूक लढविणार नाही. मात्र प्रत्येक माणसाशी संबधित असलेल्या पर्यावरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी  दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या कणकवलीतील मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले. राजकारणात आल्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्गात विकासाची पायाभरणी केली असल्याचे ते म्हणाले. हवामानात बदल होत असल्यानं वादळांची संख्या वाढतेय. अवकाळी पाऊस वर्षभर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले आहे. राजकारण विरहीत प्रश्न सोडवायचे आहेत, त्यामुळेच निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रभूंनी स्पष्ट केले.


सीएचा व्यवसाय चांगला चालत असताना राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी घरातील मंडळींचा विरोध होता. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे राजकारणात आलो आणि खासदार झाल्याचे त्यांनी नमूद केले.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha