बीड : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या सुरेश धस यांच्यावर टीका केली. या टीकेला सुरेश धस यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. विशेष म्हणजे, अजित पवार यांनी वैयक्तिक पातळीवर टीका केल्याने धसही प्रचंड संतापले असून, अजित पवारांना त्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.


अजित पवार काय म्हणाले होते?

“एखाद्याला संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करायचं की त्याची राख करायची, हे ज्याच्या-त्याच्या हातामध्ये असतं. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी काम करतोय, तोपर्यंत या गद्दारांना राष्ट्रवादीत प्रवेश नाही. काय काय माणसं वेळ पडली तर पाय धरतात, डोळ्यात पाणी आणतात. ज्यांनी स्वत:च्या पहिलीला सोडलं नाही, ते इतरांना काय सोडणार? तुमच्या मनात जे आहे, ते माझ्या मनात आहे.”, असे म्हणत अजित पवारांनी सुरेश धस यांचं नाव न घेता टीका केली.

सुरेश धस यांन अजित पवारांना काय उत्तर दिले?

“आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून. किमान अजितदादांनी तरी अशी वाक्य वापरु नयेत. त्यांच्याबद्दल मलाही बरंच काही बोलता येईल. परंतु, अजूनही मी बोललेलो नाही. कदाचित, उद्या-परवापासून बोलायला सुरुवात करेन.”, असा शब्दात सुरेश धस यांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर देत इशाराही दिला आहे.

आता अजित पवार आणि सुरेश धस यांच्यातील टीकेचं हे युद्ध कुठवर पोहोचतंय, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

पाहा व्हिडीओ :