इंदापूर :  इंदापूर विधानसभेचे महाआघाडीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारासाठी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे इंदापूरला आले होते. शरद पवार सभेच्या ठिकाणी आले असता उपस्थितांनी घोषणाबाजी सुरु केली. यावेळी 'कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा बाप आला', 'अरे कोण आला रे कोण आला, मोदी शाहाचा बाप आला' अशा घोषणा थांबत नव्हत्या. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी माईकचा ताबा घेतला. तरीही घोषणा काही थांबत नव्हत्या. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी मिश्कील टिप्पणी करत 'अरे तो सुप्रियाचा ही बाप आहे, हे विसरू नका, असे म्हटले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.


परिवर्तन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे हे निर्विवाद सत्य आहे असेही त्या म्हणाल्या. साताऱ्यामध्ये पवारसाहेबांचे कालचे भाषण बघून काय वाटले तर दिल्लीच्या तख्तासमोर खंबीरपणे जर कुठला सह्याद्री उभा राहू शकतो तो म्हणजे शरद पवार हे नाव आहे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

या बारामतीत जन्माला आलेला पुत्र हा देशातील कुठल्याही दिल्लीच्या तख्ताला घाबरत नाही. आरे ला कारे म्हणणारा कोण असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार आहेत त्यामुळे तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असाच ठेवा असे आवाहनही  सुळे यांनी केले.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, याआधी अजित दादाला एक लाख मताधिक्याने निवडून दिलंत. आता दोन लाख मताधिक्याने निवडून देणार आहात. त्यामुळे यावेळी राज्याचा नाही तर देशाचा रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे.