लातूर :  शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत शिवसैनिकांनीच राडा घालत आपल्याच उमेदवाराला अपशब्द वापरत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांनी आज पत्रकारांशी वार्तालाप करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र या पत्रकार परिषदेत लातूर ग्रामीणचे तालुकाध्यक्ष हरी साबदे आणि युवासेना जिल्हाध्यक्ष कुलदीप सुर्यवंशी यांनी उमेदवार सचिन देशमुख यांना अपशब्द वापरत शिवीगाळ करायला सुरुवात केली.


यावेळी बाबा रामदेव प्रचाराला न आल्यामुळे संताप अनावर झालेला पाहायला मिळाला. तसेच प्रचार काळात उमेदवार सचिन देशमुख यांनी प्रचार केला नसल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघाची जागा ऐनवेळी शिवसेनेच्या वाट्याला आली. अतिशय नवख्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली. तसेच उमेदवार सचिन देशमुख यांची कोणतीही प्रचार यंत्रणा नव्हती, असा आरोपही शिवसैनिकांनी केला आहे.  त्यात बाबा रामदेव प्रचारला येणार होते ते आले नाहीत यामुळे शिवसैनिकांचा संतापला उमेदवार सचिन देशमुख यांना सामोरे जावे लागले.

उमेदवार सचिन देशमुख यांनी मतदारसंघात प्रचार केला नाही. यामुळे शिवसैनिकांचा अपमान झाला आहे, अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याचा राग मनात धरून शिवसेना कार्यकर्त्यांनी रामेदव बाबांबद्दलही अपशब्दांचा वापर केला. सचिन देशमुख हा उमेदवार आम्हाला माहित नाही. हा उमेदवार प्रचार काळात गायब होता. नालायक उमेदवार आहे. कसलाही प्रचार उमेदवाराने केला नाही. यामुळे शिवसेनेचा अपमान झाला आहे असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. धीरज देशमुख यांच्यासह आता सचिन देशमुख यांच्यापुढे अंतर्गत वाद मिटवण्याचे आव्हान आहे.