नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पक्ष सोडून जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडून जाणार का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी सूचक उत्तर दिलं आहे. प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या मोठी पडझड सुरु आहे. अशा कठीण काळात आपली माणसं सोडून गेलं की वाईट वाटतं. कारण मोठ्या मेहनतीने ही संघटना उभी राहिली आहे. आम्ही फक्त पक्ष म्हणून काम नाही करत, तर एक कुटुंब म्हणून गेली अनेक वर्ष काम करत आहोत. आपल्या देशात लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाला आपले निर्णय घ्यायचे अधिकार आहेत. दबावतंत्र वैगरे अशा गोष्टी आमच्या तत्वात बसत नाहीत. त्यामुळे कुणी पक्ष सोडून जात असेल तर तो त्यांचा निर्णय आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
तसेच पक्ष सोडून जाणाऱ्यांबद्दल माझ्या मनात अजिबात राग नाही. पक्ष सोडून गेलेल्या प्रत्येकाने माझ्या वडिलांच्या आयुष्यात त्यांना साथ दिली आहे, याची जाणीव मला नेहमी राहील. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमी आदर आणि शुभेच्छाच असतील, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळांना पक्षात 'नो एन्ट्री', उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आश्वासन : सूत्र
गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. मात्र नाशिकमधील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला तीव्र विरोध आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमदार, खासदार यांनी काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि भुजबळांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला. यावर भुजबळांना शिवसेनेत घेतलं जाणार नाही, असं आश्वासन उद्धव ठाकरेंना सर्वांना दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती. त्यामुळे शिवसेनेची दारं बंद झाल्यानंतर आता भुजबळ आता कोणत्या पक्षाचं दार ठोठवणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.