पुणे: यशवंतराव चव्हाण साहेबांनी शरद पवारांना मानसपुत्र मानलं होतं, मात्र त्यांचा वारसा कोण चालवेल हे काळच ठरवेल, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. त्या आज पुण्यात बोलत होत्या.

पवारांच्या संसदीय कार्याला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननं राज्यस्तरीय शालेय निबंध आणि महाविद्यालयीन वक्त्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं.

शरद पवारांनंतर राष्ट्रवादीची धुरा अजित पवार सांभाळणार की सुप्रिया सुळे या प्रश्नावर आजवर पवार कुटुंबातील कुणीही कधीही जाहीर भाष्य केलं नव्हतं. मात्र आज सुप्रियाताईंनी शरद पवारांचा वारस काळ ठरवेल असं म्हटल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारच्या महिला सुरक्षा, कुपोषण, शेतकरी आत्महत्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभं केलं.