सांगली : दोन दिवसांपूर्वी सर्वजण दिवाळीचा उत्साह साजरा करण्यात व्यस्त होते. मात्र सांगलीकरांना यावेळी भलताच अनुभव आला. स्कूटीवरुन निघालेल्या एका चालकाच्या हँडलवर अचानक कोब्रा येऊन उभा राहिला.


चालत्या गाडीवर साप, तोही कोब्रा, या चित्राची कल्पना जरी केली, तरी अनेकांची पाचावर धारण बसते. मात्र प्रत्यक्षात ही घटना सांगली-तासगाव रस्त्यावर पाहायला मिळाली.

गाडी थांबवावी की तशीत पुढे न्यावी हा यक्षप्रश्न चालकासमोर होता. मात्र जीव वाचवण्यासाठी काहीतरी निर्णय घेणं गरजेचं होतं. त्यामुळेच चालकाने चालत्या गाडीवरुन उडी मारुन जीव वाचवला.

गाडीवरुन उडी मारल्यामुळे खरचटलं, पण सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही. त्यानंतर दुचाकीस्वाराने उठून साप-साप असा आरडाओरडा सुरु केला.

काय आहे प्रकरण?

तासगावमध्ये एक व्यक्ती स्कूटीवरुन बाजाराकडे निघाला होता. स्कूटी वेग पकडणार, इतक्यात हँडलवर साप येऊन उभा राहिला. साप आल्याने त्या व्यक्तीने बाईकवरुन उडी मारली. त्यानंतर त्याने आजूबाजूच्या नागरिकांना बोलावून गाडीत असलेल्या सापाबद्दल माहिती दिली.

तासभर रेस्क्यू ऑपरेशन

या प्रकारानंतर स्थानिकांनी सर्पमित्र आणि वनविभागाला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर तासाभरांच्या प्रयत्नानंतर स्कूटीमध्ये अडकलेल्या सापाला बाहेर काढण्यात यश आलं.

स्कूटीमध्ये साप आत अडकल्यामुळे त्याला नेमकं बाहेर कसं काढायचं, हा प्रश्न वनअधिकाऱ्यांसमोर होता. त्यामुळेच तो बाहेर काढण्यासाठी इतका वेळ लागल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

भारतीय कोब्रा जातीचा हा साप सुमारे दीड फूट लांबीचा आहे. हा साप अनेक दिवसांपासून स्कूटीतच अडकलेला असावा, असा अंदाजही वर्तवण्यात आला. दरम्यान, या सापाला जंगलात सोडण्यात आलं.

VIDEO: