पुणे : पुण्यात आपल्या न्याय हक्कासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मूकबधिर तरुण जमले होते. मात्र या मूकबधिर तरुणांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना निषेध केला. तसेच घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्या तरुणांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.


सरकार असं असंवेदनशील वागू शकतं, याचा मला धक्का बसला आहे. हे देवेंद्र फडणवीस सरकार नाही, तर जनरल डायर फडणवीस सरकार आहे, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली. ज्यांना आवाज नाही त्यांच्यावर लाठीचार्ज करणे, ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्रात असा प्रकार आजवर झालेला नाही आणि या घटनेचा मी निषेध करत असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.


VIDEO | कर्णबधिर मोर्चेकऱ्यांवर लाठीचार्ज, राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका | पुणे | एबीपी माझा


<

आंदोलनकर्ते तरुण सकाळपासून उपाशी आहेत. निदान पाणी तरी प्या अशी विनंती सुप्रिया सुळेंनी या विद्यार्थ्यांना केली, मात्र त्यांनी नकार दिला. उद्या दिवसभर सुप्रिया सुळे या मुलांसोबत आंदोलनस्थळी असणार आहेत.


हा राजकीय प्रश्न नाही तर सामाजिक प्रश्न आहे. सातत्याने असंवेदनशील वागणाऱ्या सरकारचा अतिरेक झाला आहे. या तरुणांच्या मागण्या ऐकून घेण्यास सरकार तयार नाही. घटना घडल्यानंतर सरकारचा एकाही प्रतिनिधीने या आंदोलनकर्त्या तरुणांची भेट घेतली नाही. प्रचारासाठी गावभर फिरणाऱ्या सरकारच्या प्रतिनिधींकडे या आंदोलनकर्त्या तरुणांना भेटण्यास वेळ नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.


या तरुणांच्या मागण्यांची सरकारने गंभीर दखले घेतली पाहिजे. तातडीने चर्चा करुन यावर तोडगा काढला पाहिजे. सरकारने लवकरात लवकर या तरुणांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास मी सुद्धा या तरुणांसोबत उपोषण करणार असल्याचा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला.


पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कर्णबधिर तरुण-तरुणी आज पुण्यात आले होते. मात्र आंदोलनकर्त्या तरुणांवर पोलिसांना लाठीचार्च करुन आंदोलन दडपडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्वच स्तरातन या घटनेचा निषेध होताना दिसत आहे.


VIDEO | देवेंद्र फडणवीस सरकार नाही, तर हे जनरल डायर फडणवीस सरकार आहे : सुप्रिया सुळे | पुणे | एबीपी माझा