Supriya Sule Instagram Post: खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) या कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांच्या अनेक पोस्ट व्हायरलदेखील होतात. अशीच एक पोस्ट (Instagram Post) सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुणे जिल्ह्यातील भोर गावातील जवळचे सहकारी जानबा पाठरे हे खास सुप्रिया सुळे यांच्यासाठी अळू वडीचा डबा घेऊन आले होते. त्याचं हे प्रेम पाहून सुप्रिया सुळे आनंदी झाल्या. यापेक्षा दुसरा अशीर्वाद काय असू शकतो?, अशा आशयाची त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. त्या सध्या पुणे जिल्ह्यातील गावांच्या दौऱ्यावर आहेत. ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा दौरा सुरु आहे.
पोस्टमध्ये सुप्रिया सुळेंनी काय लिहिलंय?
या काकांसाठी सुप्रिया सुळे यांनी खास पोस्ट केली आहे. त्यात त्या लिहितात की, "हे नाते आपुलकीचे आहे. भोर तालुक्यातील आपटी या गावचे जानबा पारठे हे आदरणीय पवार साहेबांचे जुने सहकारी आहेत. मी जेव्हा त्या मार्गावरुन जाते तेव्हा हे काका माझी वाट पाहत थांबलेले असतात. ते माझी विचारपूस करतात आणि अतिशय प्रेमाने अळूची वडी व भाकरीचा डबा देतात. ही साधी पण आपुलकी व प्रेमाने ओथंबलेली भेट.... आवर्जून नमूद करायची बाब म्हणजे ते साहेबांना देखील असाच डबा देतात. अगदी मध्यंतरी ते दिल्लीला जाऊन आले तेव्हा त्यांनी साहेबांसाठी खास हा डबा बांधून आणला होता. ही प्रेमळ भेट तर आहेच पण त्याहीपेक्षा मोठा तो आशीर्वाद देखील आहे. या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. धन्यवाद..."
शरद पवारांना देखील देतात डबा
जुने सहकारी आणि जुने मित्र आपल्या आवडीनिवडी कायम लक्षात ठेवतात. जानबा पारठे यांनी देखील शरद पवारांची आवड लक्षात ठेवून जेव्हा त्यांच्या भेटीचा मुहूर्त येतो तेव्हा त्यांच्यासाठी आवडीच्या अळूच्या वड्यांचा डबा घेऊन जातात. काही दिवसांपूर्वीच पारठे दिल्लीला गेले असता शरद पवारांसाठी अळूच्या वड्याचा डबा घेऊन गेले होते, अशी आठवण सुप्रिया सुळेंनी सांगितली. त्यांच्या या प्रेमामुळे आम्ही सगळे कायम त्यांचे ऋणी आहोत, असंही त्या म्हणाल्या.
पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस
सुप्रिया सुळेंच्या या भावनिक पोस्टवर त्यांच्या हितचिंतकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. शरद पवारांवरचं आणि त्याच्या कुटुंबीयांवर कार्यकर्त्यांचं प्रेम या प्रतिक्रियांच्या माध्यामातून लक्षात येतं. 'हे प्रेम आहे ताई नशिबाने मिळतात अशी माणसं', हीच खरी संपत्ती आहे, अशा अनेक प्रतिक्रिया त्याच्या पोस्टवर अनेकांनी केल्या आहेत.