जालना :  जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mega Highway) कामासाठी गौण खनिजाचं अवैध उत्खनन केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन टप्प्यात 328 कोटींचा दंड ठोठावला होता. समृद्धी महामार्गाचे कंत्राटदार मॉन्टे कार्लो लि या कंपनीला ठोठावलेल्या 328 कोटी दंडाच्या विरोधातील आव्हान याचिका सर्वाेच्च न्यायालयाने काल फेटाळली आहे. जालना जिल्ह्यातील जालना तालुका आणि बदनापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी अवैध गौण खनिज उत्खनन केल्याबाबत जालन्याच्या तहसीलदारांनी ठोठावलेल्या 328 कोटी  रुपयांच्या दंडाविरुद्ध कंत्राटदार संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद  खंडपीठात दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या याचिका यापूर्वीच फेटाळल्या होत्या.  दरम्यान सर्वाेच्च न्यायालयाने  कंपनी विरोधातील याचिका फेटाळल्याने कंपनीला 328 कोटी रुपये दंड आता भरावाच लागणार आहे


जालना जिल्ह्यात परवानगीच्या मर्यादेपेक्षा कंपनीने जास्त गौण खनिजाचे उत्खनन केल्याच्या समितीच्या अहवालावरून तहसीलदारांनी मॉन्टे कार्लो  कंपनीला 165 कोटी, 87 कोटी व 77 कोटी अशा तीन टप्प्यांत एकूण 328 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. तहसीलदारांनी ठोठावलेल्या दंडाविरुद्ध  कंपनीने तीन वेगवेगळ्या याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्या होत्या. या तिन्ही याचिका औरंगाबाद  खंडपीठाने फेटाळल्या होत्या. 


समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात


मुंबई-नागपूर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे 700 किमी पैकी 500 किमीचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील अधिवेशनात दिली होती. समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून कदाचित मार्च महिन्यापर्यंत समृध्दी महामार्ग काहीअंशी सुरू होण्याची शक्यता आहे. कॉम्प्रेड रिजिड सिमेंट पेव्हर या अत्याधुनिक  तंत्रज्ञानाचा वापर करून हा महामार्ग बनविण्यात आला आहे. याशिवाय, नागपूर - मुंबई दरम्यान 701 किमीच्या या मार्गावर कुठेही गतिरोधक नाही. या महामार्गाची वेग मर्यादा तासी 150 किमी जरी असली तरी, या माहामार्गाची वेगमर्यादा 180 किमी प्रति तास बनविण्यात आली आहे.





संबंधित बातम्या


Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर यामुळे घडू शकतात मोठे अपघात, वाहन तज्ज्ञांकडून भिती व्यक्त



समृद्धी महामार्गाचं 500 किमीचं काम पूर्ण; नागपूर ते शिर्डी मार्ग 1 मेपासून सुरु होणार : अजित पवार