Chinchwad bypoll Election : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini jagtap) आणि लहान बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap)  या दोघांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (chinchwad bypoll election) भाजपकडून उमेदवारी अर्ज घेतला आहे. भाजपच्या चिंचवडच्या जागेवर दोघांनी दावा केला आहे. यानिमित्ताने पुन्हा जगताप कुटुंबातील वाद समोर आल्याच्या चर्चा रंगू लागल्या. या दोघांनी उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.


अश्विनी जगताप आणि शंकर जगताप या दोघांच्या समर्थकांना सोशल मीडियावर काही पोस्ट करायला सुरुवात केली आहे. समर्थकांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवर समर्थन दर्शवलं आहे. त्यात वेगवेगळ्या टॅगलाईन वापरल्या आहेत. अश्विनी जगताप यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या इमेजमध्ये "आदेश पक्षाचा, निर्धार जनतेचा" असा आशय लिहिण्यात आला आहे. तर शंकर जगताप समर्थकांकडून फिरवल्या जाणाऱ्या इमेजवर, "एक ही कार्यकर्ता 'लक्ष्मण' रेषा ओलांडणार नाही, आमदार शंकरशेठ झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आमदार जगतापच." असा आशय लिहिण्यात आला आहे. 


दोन्ही पोस्टवर भाजपचे चिन्ह


अश्विनी जगताप आणि शंकर जगताप या दोघांचे समर्थक आता पोटनिवडणुकीसाठी सज्ज झाल्याचं चित्र आहे. कालच (2 फेब्रुवारी) दोघांनीही उमेदवारी अर्ज घेतला. त्यामुळे दोघांनीही भाजपच्या जागेवर दावा केला. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या नावाने पोस्ट व्हायरल करण्यात येत आहेत. यात वेगवेगळ्या पद्धतीच्या टॅगलाईन्स वापरण्यात आल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे या व्हायरल करण्यात येत असलेल्या दोघांच्याही पोस्टच्या इमेजवर भाजपचं चिन्ह असल्याने कुटुंबातील वाद पुन्हा समोर आल्याची चर्चा आहे. 


समर्थकांकडून सोशल मीडियावर वॉर


दोघांच्या समर्थनाच्या पोस्ट सध्या सगळीकडे व्हायरल केल्या जात आहे. त्यात समर्थकांमध्येही दोन गट पडल्याचं चित्र आहे. दोन्ही गटाकडून सोशल मीडियावर वॉर सुरु झाले आहेत. सोशल मीडियावर समर्थकांकडून हे वॉर सुरू झाल्याने जगताप कुटुंबातील वादाला आणखी फोडणी मिळत आहे. पोटनिवडणूक जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांसह अनेक नागरिकांनी शंकर जगताप यांचा भावी आमदार म्हणून फोटो टाकण्यास सुरुवात केली होती. व्हॉट्सअॅप स्टेट्स आणि रील्सही करण्यात व्हायरल करण्यात आले होते. मात्र अश्विनी जगताप यांच्या नावाने या पूर्वी कधीही रिल्स किंवा अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल करण्यात आल्या नव्हत्या. यावेळी मात्र दोघंही तयारीने मैदानात उरणार असल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर सुरु असलेल्या वॉरमुळे समर्थकांमध्येही दोन गट पडल्याचं समोर आलं आहे.