नागपूर : सहावीच्या भूगोल विषयाच्या पुस्तकात गुजराती धडे छापल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी समोर आणल्यानंतर विधानपरिषदेमध्ये जोरदार रणकंदन माजले. मात्र, हे पुस्तक सुनील तटकरेंनी बाहेर छापून आणले असावे, असी शंका चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केल्यानंतर सुनील तटकरे आणखी आक्रमक झाले. सभागृहात विष घेऊन आत्महत्या करेन, परंतु असे काम कधी करणार नाही, असे म्हणत तटकरेंनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा निषेध केला.

नेमकं प्रकरण काय आहे?

सहावीच्या भूगोल पुस्तकामध्ये गुजराती धडे छापल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी समोर आणल्यानंतर विधानपरिषदेमध्ये जोरदार रणकंदन माजले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उचलून धरल्यामुळे सभागृह दोनवेळा तहकूब करावे लागले आणि सभापतींनी सरकारला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न उचलून धरल्यामुळे शेवटी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

सभागृह नेते चंद्रकांत पाटलांचं तटकरेंना उत्तर

“माझ्याकडे सहावीचे भूगोल पुस्तक आहे. परंतु त्या पुस्तकात एकही गुजराती पान नाही आणि हे पुस्तक जूनमध्ये छापण्यात आले आहे. त्यामुळे आमदार सुनील तटकरे यांना जर असे काही सापडले असेल तर त्यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच का सादर केले नाही?”, असे उत्तर सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी तटकरेंना दिले. चंद्रकांत पाटलांच्या उत्तरानंतर आणखी वाद निर्माण करुन दिला. त्यामुळे सभागृहात आणखी गोंधळ सुरु झाला.

धनंजय मुंडेंचा सवाल

तात्काळ विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करत या पुस्तकाबाबत सभागृह नेत्यांनी शंका निर्माण केली आहे. या पुस्तकाच्या एक लाख प्रती गुजरातमधील श्लोक प्रिंट अहमदाबाद कंपनीकडून छापून घेतल्या असल्याचे सांगितले. हा आमच्या महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या अस्मितेचा प्रश्न असून भूगोल पुस्तकामध्ये 15 गुजराती पाने आली कशी?, असा धनंजय मुंडेंनी सवाल केला.

सभापतींचा राज्य सरकारला आदेश

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर यांनी जे घडले आहे, ते विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घातक आहे. दादा हा अस्मितेचा महत्वाचा मुद्दा जितका महत्वाचा आहे, तितकाच तो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे मी सोमवारपर्यंत राज्यसरकारने यावर स्पष्टीकरण द्यावे, असे आदेश सभापतींनी दिले असल्याचे स्पष्ट केले.

...तर आत्महत्या करेन : तटकरे

त्यानंतर, आमदार सुनील तटकरे यांनी हे पुस्तक बाहेरुन छापून आणले असावे, अशी शंका चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर सुनील तटकरे आणखी आक्रमक झाले. तटकरे म्हणाले, “मी माझ्या 30-35 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये असे घाणरडे राजकारण केले नाही. मी एकवेळ या सभागृहात विष घेऊन आत्महत्या करेन, पण असे काम कधी करणार नाही.”

सुनील तटकरेंनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडल्यानंतर सभागृहात इतर आमदारांकडून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. त्यानंतर सभागृहात घोषणा सुरु झाल्या. त्यामुळे शेवटी सभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.