मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर डिव्हायडरला धडकून गाडी दरीत कोसळली
एबीपी माझा वेब टीम | 07 Sep 2016 05:43 AM (IST)
पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर डिव्हायडरला धडकून एक सुमो गाडी दरीत कोसळली आहे. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास लोणावळ्याजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर सहाजण जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या गाडीतील एकाच्या खिशात शनी शिंगणापूरच्या मंदिराची पावती सापडली आहे. त्यामुळे गाडीतील सर्वजण शनी शिंगणापूरला दर्शनासाठी गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघातग्रस्त गाडीच्या मालकाचं नाव अनंत वाघचौरे आहे, पण तो या गाडीत होता की नाही हे ही अद्याप अस्पष्ट आहे. गेल्या काही दिवसांत एक्स्प्रेस वेवरील अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवर नजर ठेवण्याचं प्रात्यक्षिक काही दिवसांमागे घेण्यात आलं होतं.