जालना : जालन्यात भाजप आमदाराच्या अररेरावीला कंटाळून बदनापूरच्या पोलिस निरीक्षक विद्यानंत काळे यांनी कुटुंबासह आत्महत्या करणार असल्याचा एसएमएस थेट पोलिस अधीक्षकांना पाठवला. आमदार वारंवार अनधिकृत कामं सांगत असल्याने  वैतागलेल्या पोलिस निरीक्षकांना हे पाऊल उचलावं लागलं. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.


आदरणीय, पोलिस अधीक्षक

मी विद्यानंद काळे. सध्या बदनापूर पोलीस ठाण्यात पोस्टिंगला आहे. पण मी इथे आल्यापासूनच भाजप आमदार नारायण कुचे कार्यालयीन कामात अडथळे आणतात.

त्यांचं ऐकलं नाही तर धमकावतात. त्यांच्या अपमानास्पद वागणुकीच्या सगळ्या क्लिप्स आणि स्टेशन डायरीच्या नोंदी माझ्याकडे आहेत.

याआधीही नारायण कुचे यांच्या तक्रारी करुन काहीही झालं नाही. ही व्यवस्था पोलिसांचं संरक्षण करण्यास कमजोर आणि कुचकामी आहे.

त्यामुळे मी माझ्या कुटुंबासह आत्महत्या करण्याचा विचार करतोय. कुचेंविरोधातील सगळे पुरावे मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयास पाठवत आहे

- विद्यानंद काळे

पोलिस शिपाई विलास शिंदेंच्या मृत्यूनंतर पोलिस निरीक्षक विद्यानंद काळेंच्या पत्राने गृहखात्याची लक्तरं काढली आहेत. बदनापूरचे आमदार नारायण कुचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या जवळचे आहेत. कुचे यांनी अवैधपणे वाळूची वाहतूक करणारा ट्रक सोडण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. इतकंच नव्हे तर एका अपघात प्रकरणातील आरोपीचं नाव बदलण्यासाठीही धमकावलं होतं. स्टेशन डायरीत या सगळ्या प्रकरणाची नोंद आहे.



2 ऑगस्टला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना कलम 68 अंतर्गत गुलाल विकण्यास पोलिसांनी बंदी घातली.  व्यापाऱ्यांनी याची तक्रार नारायण कुचेंकडे केली. यानंतर कुचेंनी विद्यानंद काळे यांना फोन करुन अर्वाच्य शिवीगाळ केली आणि धमकीही दिली.

त्यामुळे 3 सप्टेबरला विद्यानंद काळेंनी एसपींना मेसेज करुन आपले फोन बंद केले आणि कुटुंबासह घर सोडून निघून गेले. गेले तीन दिवस जालना पोलिस विद्यानंद काळेंचा शोध घेत होते. अखेर आज त्यांचा पत्ता सापडला.

पोलिसांच्या छळाचं प्रकरण सार्वजनिक झाल्यावर गृहखातं जागं झालं आहे. गृहखात्याने पोलिस महानिरीक्षक अजित पाटील यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

तुमसरला भाजप आमदार अवसरेंनी पोलिस कॉन्स्टेबलच्या कानशिलात भडकावली. मुंबईत दोघांनी पोलिस शिपायाला मारहाण केली, ज्यात विलास शिंदेंचा मृत्यू झाला. आता आमदाराच्या धमकीमुळे पोलिस निरीक्षकच घर सोडून गेले, आता पोलिसांना संरक्षण देण्यासाठी फडणवीसांनी नव्या व्यवस्थेची तयारी करावी म्हणजे झालं.