बुलडाणा : गरीब शेतकऱ्यांसाठी लढणारी सुकाणू समिती आता धनदांडग्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळावा म्हणून आंदोलनाची भाषा करत आहे, असा गंभीर आरोप कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलाय. बुलडाण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.


राज्य सरकारने सरसकट दीड लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. ज्याचा फायदा 89 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. तसंच 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे.

मात्र हा दावा चुकीचा असल्याचं म्हणत सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करत सुकाणू समिती आक्रमक झाली आहे. तसंच पुन्हा नव्याने आंदोलन छेडण्याची तयारी अजित नवले, बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी केली आहे.

सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीला सुकाणू समितीचा विरोध आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी सुकाणू समितीने केली आहे. त्यासाठी सरकारविरोधात सुकाणू समिती आंदोलनही करणार आहे.