ठाणे : मुंबई आणि उपनगरात सुरु असलेल्या जोरदार पावसाचा फटका, लोकल वाहतुकीसह रेल्वे स्टेशनवरील वायफायलाही बसला आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्टेशनवरील रेल वायरचं वायफाय पावसामुळे बंद पडलं आहे.


रेल्वेने गुगलसोबत टायअप करुन मुंबईतील मोजक्या स्टेशनवर वायफाय सेवा सुरु केली. रेल्वेचे हजारो प्रवासी लॉगइन करुन या वायफायचा उपयोग करतात.

पण मुंबई उपनगरात रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम आहे. ठाणे स्टेशनवर खांब्यावरील पत्र्याची सफाई न केल्याने, कचरा मधल्या नळीत अडकला. त्यामुळे पाणी बाहेरुन वाहू लागलं. हे पाणी खाली असलेल्या वायफायच्या यंत्रणेवर पडलं. परिणामी वायफाय बंद  झालं.

वायफाय पुन्हा सुरु होण्यास वेळ लागणार असल्याचं रेल्वेतर्फे सांगण्यात आलं आहे.