पंढरपूर : यंदा साखरेच्या उत्पादन वाढ झाल्याने गोदामात साखर ठेवायला जागा शिल्लक राहिल नाहीये. साखरेचे दर घसरल्याने व्यापारीही खरेदीला पुढे येत नसल्याने साखर उद्योग मोठ्या अडचणीत सापडला आहे. यंदा देशात जवळपास 400 लाख मेट्रिक टन एवढे साखरेचे उत्पादन होत असून देशाची गरज केवळ 250 लाख टन  आहे. त्यामुळे उरलेली 15 लाख टन साखर ठेवायची कुठे? हा प्रश्न कारखानदारासमोर उभा ठाकला आहे. यातच शासनाच्या 3100 रुपये दराने साखर खरेदीस व्यापारी पुढे येत नसल्याने साखर गोदामात पडून राहत आहे. यामुळे साखरेवरील बँकांच्या व्याजाचा प्रतिटन 250 ते 450 रुपयाचा भूर्दंड कारखान्यांवर पडू लागला आहे. 


यंदा महाराष्ट्रात आत्तापर्यंत 958 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 100 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. 189 सहकारी साखर कारखान्यांपैकी आत्तापर्यंत 101 कारखाने बंद झाले असले तरी अजून 88 कारखान्यांचे गाळप सुरु आहे. त्यामुळे राज्यातील साखरेचं उत्पादन 120 लाख टनापर्यंत जाणार आहे . गेला हंगाम संपताना ऑक्टोबरमध्ये 90 लाख टन साखर शिल्लक होती. त्यातच या नवीन साखरेची भर पडल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार झालेल्या अतिरिक्त साखरेचे करायचे काय? हा शासनासमोरचा प्रश्न आहे. 


ज्यादा झालेल्या साखर निर्यातीसाठी केंद्राने 50 लाख टन साखर 2600 रुपयांनी निर्यात करण्यास परवानगी दिली आहेत. तसं असलं तरी ती एकूण साखरेच्या 20 टक्के देखील नसल्याने केंद्राने निर्यातीचा कोटा वाढवण्याची मागणी आता होत आहे. आता शासनाने साखर उत्पादन थांबवून इथेनॉलकडे वळण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी अचानक सर्वच उसाची इथेनॉल निर्मिती शक्य नसल्याची कारखान्यांची भूमिका आहे. यंदा प्रचंड प्रमाणात तयार झालेली साखर ही कारखानदारांची मोठी अडचण बनली असून पुढच्या हंगामाच्या ऊस दरावर याचा परिणाम होणार असल्याने साखर उद्योग व शेतकऱ्यांचे तोंड कडू होण्याची शक्यता जास्त आहे.