उस्मानाबाद : साखर कारखान्यातून ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा देशातला पहिला प्रयोग आज यशस्वी झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या धाराशिव या खाजगी साखर कारखान्यामध्ये रोज नव्वद ते शंभर जम्बो सिलेंडर भरतील एवढा ऑक्सिजन उत्पादित होऊ लागला आहे. येत्या काही दिवसात हे प्रमाण 600 सिलेंडरपर्यंत जाईल. एखाद्या साखर कारखान्यातून ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा प्रयोग होऊ शकतो यावर कोणालाच विश्वास नव्हता मात्र धाराशिव सारख कारखान्याने हे करुन दाखवलं आहे.
धाराशिव कारखान्यामध्ये इथेनॉल आणि अल्कोहोलची निर्मिती होते. त्यासाठी 60 कोटी रुपये गुंतवणूक करून यंत्रणा उभारलेली आहे. पुर्वीचीच यंत्रणा वापरून हा प्रयोग करायचे ठरले. कारखान्याने आणखी एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मौज इंजिनीयरिंगच्या धीरेंद्र ओक यांनी संपूर्ण भारतीय बनावटीच्या ऑक्सिजन प्लॅंट तयार केला आहे. यात परदेशी बनावटीचा कॉन्सन्ट्रेटर आणि जर्मनीमधून मॉलिक्युल आणावे लागले.
शरद पवार यांनी 25 साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी असं सुचवलं होते. परंतु आजपर्यंत केवळ चारच साखर कारखान्यांनी ऑक्सीजन निर्मितीसाठीच्या यंत्रणेची मागणी नोंदवली आहे. इथेनॉल निर्माण करणाऱ्या कारखान्यांचे तेल कंपन्या बरोबर इथेनॉल पुरवठ्याचे करार आहेत. ते करार अडचणीत येतील, नुकसान होईल अशी भीती इतर साखर कारखानदारांना आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर पंढरपूरचे तरुण उद्योजक अभिजित पाटील यांनी नुकसान सोसत हे पाहिले पाऊल उचलले आहे. वसंतदादा इन्स्टिट्यूटने 23 एप्रिल रोजी झूमद्वारे राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची मिटींग घेतली होती. राज्यात 174 इथेनॉल निर्मिती करणारे साखर कारखाने असून आता अभिजित पाटील यांच्यानंतर इतर कारखान्याने हा प्रकल्प हातात घेतल्यास राज्यालाच नाही तर देशालाही ऑक्सिजन पुरेल एवढी क्षमता महाराष्ट्रात तयार होऊ शकणार आहे.
ज्या कारखान्यांकडे इथेनॉल प्रकल्प सुरू आहेत. अशा प्रकल्पामध्ये जुजबी फेरफार करून अतिरिक्त सामग्रीत 'माॅलेक्युलर सिव्ह' वापरून हवेतील वायुव्दारे ऑक्सिजनची निर्मीती मोठ्या प्रमाणात करता येते हे अभिजीत पाटील यांनी लक्षात घेत आपल्या धाराशिव साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती केली आहे.