मुंबई : मुंबईकरांची पुढच्या सप्टेंबरपर्यंत पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये वर्षभराचा पाण्याचा कोटा फुल्ल झाला आहे. मात्र तरीही सप्टेंबर अखेरपर्यंत तलावक्षेत्रात पाऊस पडणं गरजेचं आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात सध्या 96 % पाणीसाठा आहे. मात्र, 1 ऑक्टोबरला असणारा पाणीसाठा पुढच्या वर्षीच्या पाणी नियोजनासाठी ग्राह्य धरला जातो. त्यामुळे सध्या तलाव भरले असले, तरी सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस पडला तर पाणीसाठ्यात घट होणार नाही.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावात 13,95,306 दशलक्ष लीटर साठा जमा झाला असून, हे पाणी पुढच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत पुरेल.

मुंबईला पाणी पुरवणारी धरणं आणि त्यातील पाणीसाठा

  • तानसा – 1,43,534 दशलक्ष लीटर

  • भातसा – 6,88,506 दशलक्ष लीटर

  • विहार – 27,698 दशलक्ष लीटर

  • मोडक सागर – 1,28,910 दशलक्ष लीटर

  • अप्पर वैतरणा – 2,14,029 दशलक्ष लीटर

  • तुलसी – 8,035 दशलक्ष लीटर

  • मध्य वैतरणा - 1,84,596 दशलक्ष लीटर