पुणे : काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सहाव्या दिवशी पुणे जिल्ह्यातील इंदापुरात पोहोचली आहे. यावेळी भाषणात काँग्रेस नेत्यांनी महत्त्वाची घोषणा केली. आगामी निवडणुकीत इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटीलच असतील, असं सर्वांनी जाहीर केलं.


''शंकरराव पाटील आणि शंकरराव चव्हाण यांचे नाते आपल्या सर्वांना माहित आहे. तुमच्या मनात आहे ते आमच्याही मनात आहे. आघाडीची चर्चा होईल तेव्हा मी स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलणार आहे,'' असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.

''हर्षवर्धन पाटील आगे बढो'', अशी घोषणाही अशोक चव्हाण यांनी केली. ''हर्षवर्धन पाटील यांचा स्कोअर चांगला राहणार आहे. स्कोअर वाढवायला धोनी, विराट कोहली यांची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रात स्कोअर वाढवण्यासाठी हर्षवर्धन पाहिजे,'' असं ते म्हणाले.

आघाडी नाही झाली तरी चालेल, पण जागा सोडणार नाही : अजित पवार

इंदापूरच्या जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. कारण, काही दिवसांपूर्वीच या जागेचा मुद्दा समोर आला तेव्हा अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील आमनेसामने आले होते.

''वाट्टेल ते झालं तरी इंदापूरची जागा राष्ट्रवादीला देणार, भले आघाडी झाली नाही तरी बेहत्तर,'' अशा शब्दात अजित पवार यांनी इंदापूर विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा हक्क सांगितला होता. मे महिन्यात इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावातील आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

संबंधित बातम्या :

इंदापूरच्या जागेवरुन अजित पवार-हर्षवर्धन पाटील आमनेसामने


जत विधानसभेची जागा काँग्रेसच लढवणार, अशोक चव्हाणांकडून उमेदवारही जाहीर