पंढरपूर : शिवसेना-भाजपची गेल्या 25 वर्षांपासून नैसर्गिक युती आहे. गेल्या विधानसभेचा अपवाद वगळता आम्ही कायम एकत्र राहिलो आहोत. आता युतीच्या चर्चा सुरु झाल्याची माहिती माध्यमांना कळू देणार नाही, असं वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.


पंढरपूरमध्ये वनविभागाने सहा कोटी रुपये खर्चून उभारलेल्या तुळशीवृंदावन या संत उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुनगंटीवार आले होते. शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कुणी काळजी करायचे कारण नाही, युती नक्की होणार, असा टोलाही त्यांनी लगावला.


राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याची वक्तव्ये काही मंडळी मुद्दाम करीत आहेत. मात्र राज्य दुष्काळी जनतेला मदत करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. सध्या राज्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती असून दुष्काळी मदतीसाठी सात हजार कोटीची तयारी राज्याने केली आहे. केंद्र सरकारही मदत देण्याच्या तयारीत आहे. मात्र आम्ही केंद्राच्या मदतीची वाट न पाहता टँकर आणि चार छावण्यासाठी मदत देण्यास सुरुवात केल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.


टँकरच्या मागणीनंतरही प्रशासनाकडून टँकर सुरु होत नसतील, तर ही गंभीर बाब असून याबाबत तातडीने चौकशी केली जाईल असंही त्यांनी सांगितले. सध्या चार छावण्याऐवजी शेतकऱ्यांना थेट मदत देण्याची योजना बनविण्यात आली असून त्या पद्धतीने मदत मिळत नसेल तर पालकमंत्र्यांना याची माहिती देण्याचे आवाहन केले.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पंतप्रधानांच्या शर्यतीत असल्याबाबत चर्चांबाबतही सुधीर मुनगंटीवार यांनी  बातम्या उठवल्या जात असून खुद्द गडकरींच्या मनातही असा विचार नाही, अशी पुष्टीही मुनगंटीवार यांनी केली.