मुंबई/पुणे/नागपूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेला 'ठाकरे' चित्रपट आज आपल्या भेटीस आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी 'ठाकरे' चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल आहे. महाराष्ट्रातील बाळासाहेबांच्या चाहत्यांनी तसेच शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी संपूर्ण चित्रपटगृहांचं बुकिंग केलं आहे.


आज सकाळी मुंबईतील वडाळ्याच्या कार्निव्हल चित्रपटगृहात भल्या पहाटे साडेचार वाजता चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शो ला तुडुंब गर्दी झाली होती. या शोसाठी संपूर्ण सिनेमागृह सजवण्यात आलं होतं. पहाटे चार वाजता आधी पूजा करण्यात आली. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या हस्ते चित्रपटाचे उद्घाटन झाले. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शोला सुरुवात झाली.

बाळासाहेबांची जन्मभूमी असलेल्या पुण्यातही उत्साह
सर्वत्र 'ठाकरे' चित्रपटाचा ज्वर चढला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मभूमी असलेले पुणे शहर तर आघाडीवर आहे. हा चित्रपट शिवसैनिकाना मोफत पाहता यावा यासाठी पुण्यात शिवसैनिंकाकडून पुणे शहरातील विजय टॉकीज, सिटीप्राईड , कोथरुड यासह अजून दोन चित्रपटगृहांमधील ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ बुक करण्यात आला होता. तसेच या शेजपूर्वी ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कारही करण्यात आला.

नागपूरात चित्रपटगृह हाऊसफुल्ल

नागपूरात आज "संगम अॅडलॅब्स" या सिनेमागृहात शेकडो शिवसैनिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी आज शेकडो शिवसैनिकांसह चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शो ला हजेरी लावत चित्रपट पाहिला. नागपुरातील अनेक चित्रपटगृहांबाहेर फटाके फोडून चित्रपटांच्या खेळाला सुरुवात करण्यात आली.

वसईत ढोल ताशा पथकाचा जल्लोष

वसईच्या कार्निव्हल ड्रिम मॉल या चित्रपटगृहात शिवसैनिकांनी सकाळी 7:45 च्या शोसाठी गर्दी केली होती. चित्रपटाला सुरुवात करण्यापूर्वी खास ढोल ताशा पथक आणून सिनेमाचं स्वागत करण्यात आलं. सिनेमागृहाच्या भोवताली संपूर्ण भगव्या झेंड्यांनी भगवेमय वातावरण निर्माण केले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतरच चित्रपटाच्या खेळाला सुरुवात करण्यात आली.

नंदुरबारमध्ये बाळासाहेबांचा ड्यूप्लिकेट

नंदुरबार शहरातील नंदुरबार बिजनेस सेंटर मधील मिराज चित्रपटगृहात सकाळपासूनच तुफान गर्दी होती. या चित्रपटगृहातील आजचे सर्व शो हाऊसफुल्ल असल्याचे सांगण्यात आले आहे. चित्रपट पाहायला बाळासाहेबांचा एक चाहता बाळासाहेबांची वेशभूषा करुन आला होता. त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.