Sudhir Mungantiwar Majha Katta : लोकसभेत पराभव झालेल्या इतरांना मंत्रिपदं मिळाली, पण आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही यामागे निवडणूक लढवण्यास जाहीर अनुत्सुकता दाखवल्याची शक्यता असेल असं भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी काही तास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तशी शक्यता बोलून दाखवल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. राज्यमंत्रिमंडळातून डावलल्यानंतर सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्या सर्वांवर सुधीर मुनगंटीवार यांनी दिलखुलास चर्चा केली.
मंत्रिपद जाण्यामागे लोकसभा निवडणूक?
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "लोकसभा लढण्याची माझी इच्छा नव्हती. पण मंत्रिपद मिळालं नाही यामागे निश्चित काय कारण आहे हे मला माहिती नाही. दिल्लीत मंत्रिपद देताना काय विचार केला जातो हे मला माहिती नाही. पक्षासाठी जर हे योग्य असेल तर ते स्वीकारावं लागेल. मला अर्थमंत्री म्हणून संधी मिळाली. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं. मी प्रदेशाध्यक्ष असताना खडकवासला, अमरावती पदवीधर, शिक्षक मतदारसंघ, भंडारा गोंदीया जिल्हा परिषदा जिंकल्या. कदाचित दुसऱ्यांना संधी देण्यासाठी पक्षाने विचार केला असेल. पण ही माझ्यासाठी चांगली संधी आहे. आपल्यातील उणिवा लक्षात येतात. कदाचित अजून काही संधी मिळाली तर तीही आनंदाने पार पाडेन."
म्हणून लोकसभेवेळी जाहीर वक्तव्य केलं
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "मी लोकसभेत जाऊ इच्छित नव्हतो. माझ्या मनात महाराष्ट्रासाठी काही कल्पना होत्या. त्या अंमलात आणायच्या होत्या. छत्रपतींचा विचार मला प्रत्येक घर ते जगात पोहोचवायचा होता. सांस्कृतिक मंत्री म्हणून काम करताना अजून काही गोष्टी करायच्या होत्या. म्हणून लोकसभेत जायची इच्छा नव्हती."
मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने कधीच बघितली नाहीत. दिवसभर एवढं काम करतो की रात्री निवांत झोप लागते. पण इतरांच्या स्वप्नात तसं काही आलं असेल तर त्याची माहिती नाही असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
आश्वासन देण्याइतपत मी छोटा नाही
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "मी मंत्रिमंडळात असेल हा साधा भाव होता. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. पद गेल्यानंतरही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले. काही लोकांनी तर माझ्या नावाने विचारमंचही काढले आहेत. बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वी दोन अडीच तास केली आणि त्यावेळी नाव असल्याचं सांगितलं. पण 15 तारखेला शपथविधीच्या दिवशी मात्र नाव नसल्याचं समजलं. लोकसभेत पराभव झाल्यामुळे तुम्ही नसाल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. लोकसभा लढायची नाही अशी जाहीर इच्छा मी व्यक्त केली होती. कदाचित त्यामुळेच संधी मिळाली नसेल. दुसरीकडे पंकजा मुंडे यांना संधी मिळाली."
मोदींनाही माझे राज्यगीत गावं लागतं
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "कोणत्याही पदावर जाण्यापेक्षा आनंदापेक्षा जबाबदारी जास्त असते. सांस्कृतिक मंत्री म्हणून मी चांगलं काम केलं. आज पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले तर त्यांना माझे राज्यगीत म्हणावंच लागेल. मी वाघनखं आणली. अफजलखानाची अवैध कबर काढून टाकली."
पदावरून राजकीय कारकिर्दीचा अंदाज नको
जेव्हा मंत्रिपदाची शपथ सुरू होती त्याचवेळी मी हाती डायरी घेऊन पुढच्या पाच वर्षांत आमदार म्हणून काय करायचं याची यादी करत होतो अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. प्रत्येकाच्या आयुष्यात घाटावरचा प्रवास निश्चित असतो. पण कधीकधी समृद्धी महामार्गावर अपघात जास्त होतात. घाटावर अपघात होत नसतात असं ते म्हणाले. तसेच पदावरून कुणाही व्यक्तीच्या राजकीय आयुष्याचा चढउतार ठरवू नये. त्यापेक्षा किती कार्यकर्त्यांना सोबत घेतलं, संघटन कसं निर्माण केलं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं मुनगंटीवार म्हणाले.
ही बातमी वाचा: