Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं थंडीचा कडाका जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, पुढील 10 दिवस राज्यात हवामान कसं राहील याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे. राज्यात किमान तापमान हळूहळू घसरत असून थंडीत वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत असल्याचे खुळे म्हणाले. 


ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पहाटेच्या किमान तापमानात घसरण होत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे सरासरी इतके तर भाग परत्वे बऱ्याच ठिकाणी अर्ध्या डिग्रीपासून ते साडे तीन डिग्रीपर्यंत खालावले आहे. त्यामुळं मुंबईसह कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रातही या आठवड्यात हळूहळू थंडीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. आज तर जळगाव नगर पुणे नागपूर शहरातील पहाटेचे किमान तापमान तर एकांकी संख्येवर पोहोचले आहे. कोकणात सुद्धा डहाणू मुंबई सांताक्रूझ येथेही सरासरीपेक्षा अर्ध्या डिग्रीने किमान तापमान खालावल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. 


दिवसा ऊबदारपणा तर रात्री थंडी


याउलट दुपारी 3 चे कमाल तापमान मात्र संपूर्ण महाराष्ट्रात भाग परत्वे सरासरीपेक्षा एक  डिग्रीपासून 7 डिग्रीपर्यंत वाढले आहे. त्यामुळं दिवसा ऊबदारपणा तर रात्री थंडी जाणवत असल्याची माहिती खुळे यांनी दिली आहे. आज सकाळची सापेक्ष आर्द्रता ही सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात डहाणू सांताक्रूझ नगर सोलापूर वगळता भाग परत्वे सरासरीपेक्षा एक पासून 29 टक्क्यांपर्यंत खालावली असल्यामुळं, हवेतही त्यामानाने कोरडेपणा आहे. पहाटे पडणारे दव, धुके ही विशेषकरुन जाणवणार नाही असेही खुळे म्हणाले. त्यामुळं एकूणच हे वातावरण रब्बी पिकास अत्यंत लाभदायक ठरु पाहत आहे. 


पुढील 10 दिवस  महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही


हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 10 दिवस  महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. तोपर्यंत चांगल्या लाभदायक थंडीची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.