ठाणे : बिल्डर सूरज परमार आत्महत्याप्रकरणी जेलवारी करुन आलेले नगरसेवक सुधाकर चव्हाण यांनी पुन्हा गुंडगिरी केल्याचा आरोप शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

सुधाकर चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे गणेश टाक यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र पक्षप्रेवश केल्यानंतर गणेश टाक यांना कार्यकर्त्यांनी घरातून सुधाकर चव्हाण यांच्या बंगल्यावर नेलं. तिथे टाक यांना दमदाटी करण्यात आली, असा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

पोलीस आयुक्तांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही प्रताप सरनाईक यांनी केली आहे. गणेश टाक यांचा जबाब पोलिस नोंदवून घेणार आहेत.

सुधाकर चव्हाण यांचा इतिहास

ठाण्यात 90च्या दशकात सुधाकर चव्हाण रिक्षा चालवण्याचं काम करायचे. 1992 मध्ये त्यांनी पालिकेची निवडणूक लढवली आणि नगरसेवक झाले. 2012 ला मनसेच्या तिकीटावर त्यांनी शिवाई परिसरातून पालिकेत एन्ट्री केली. मात्र पक्षाची शिस्त न पाळल्यानं मनसेने त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला.

परिवहन समिती, स्थायी समितीसारख्या अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं. पण त्यांच्या राजकीय प्रवासाइतकीच गुन्हेगारी पार्श्वभूमीही गडद आहे.

सुधाकर चव्हाण यांच्यावर 9 गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. टाडाअंतर्गतही त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. खंडणी, जीवे मारण्याची धमकी, फसवणूक केल्याचाही गुन्हा त्यांच्यावर नोंद आहे. बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या डायरीतही चव्हाणांचं नाव आहे. शिवाय नंदलाल समितीने पालिकेतील 5 भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चव्हाणांवर ठपका ठेवला होता.

संबंधित बातम्या:

सूरज परमार आत्महत्या: आरोपी सुधाकर चव्हाणला भाजपकडून तिकीट?


भाजपमध्ये आणखी एका वादग्रस्त चेहऱ्याला प्रवेश?