मुंबई : राज्यभरात आज अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली आहे. स्कायमेट आणि हवामान खात्यानं आधीच या अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती.


या अवकाळी पावसात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसानं पुन्हा अडचणीत आणलं आहे.

राज्यात कुठे-कुठे अवकाळी पावसाची हजेरी?

नाशिक जिल्हा

सटाणा तालुक्यातील अनेक गावात आज दुपारी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तसंच काही भागात गारपीटही झाली आहे. आज दुपारी अंबासन आणि आसखेड़ा या गावात गारपीट झाली आहे. त्यामुळे अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने डाळिंब, कांदा पिकांचंही नुकसान झाले आहे

सटाणा तालुक्यातील नामपूर परिसराला आज रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास गारपीट, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपलं. अचानक आलेल्‍या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. वादळी वारा व गारपिटीमुळे परिसरातील कांदा, गहू, डाळींब, कांदा बियाणांचे मोठं नुकसान झालं आहे.

या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे. पावसाचा तडाखा इतका जबरदस्‍त होता की, काही क्षणातच अक्षरश: गाऱांचा खच रस्‍त्‍यावर पडला होता.

दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात आज देवळा,चांदवड,निफाड, सिन्नर,ओझर या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सटाणा तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने कांदा, डाळिम्ब,आंबा या पिकांचे नुकसान झालं.  काही ठिकाणी घरांचंही नुकसान झालं आहे. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बागलाण तालुक्यात सुमारे 5 ते 10 मिनिट लिम्बाच्या आकारच्या गारा पडल्या. त्यानंतर अर्धा तास मुसळधार पाऊस झाला त्यात काढ़णीला आलेला कांदा भिजून मोठं नुकसान झालं, अशीच परिस्थिती डाळिम्ब आणि आंबा पिकांची झाली. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला निसर्गाच्या या अवकाळी पावसाने आणखीनच संकटात टाकलं आहे.

पुणे

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, पिंपळवाडी, आळे फाटा परिसरात एक तास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नुकसान झालं आहे. या वाऱ्यामुळे काही घरांचे पत्रेही उडून गेले. काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले. नाणेघाट आणि जुन्नर शहरात तुरळक पाऊस झाला आहे.  वाऱ्यामुळे जास्त नुकसान झालं आहे.

धुळे

धुळे जिल्ह्यातील काळगाव, इच्छापूर,मळखेडा परिसरात गारपीट झाली आहे. गारपिटीमुळे काढणी झालेला कांदा, काढणीला आलेलं डाळिंब, शेवगा पिकाचं नुकसान झालं आहे. साडेसात मिनिटं झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावला. अक्कलपाडा धरण परिसरात तुरळक पाऊस पडला आहे.

नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी गारपीट आणि अवकाळी पावसामुळे  चाऱ्याचे आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांना काही अंशी का असेना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं याचा अंदाज घेण्याचे काम प्रशासनाकडून चालू आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.