Success Story in Marathi : डहाणूसारख्या दुर्गम तालुक्यात शिक्षणाच्या पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसताना इच्छाशक्तीच्या जोरावर अभ्यासाची जिद्द यातून स्वतःला सिद्ध करत डहाणू तालुक्यातील गंजाड दाभेपाड्यात राहणाऱ्या संजय शिडवा वायडा याने राज्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत अव्वल येण्याचा बहुमान पटकावला आहे. आदिवासी समाजामध्ये त्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावून वर्ग-2 च्या अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. अर्थात त्यांच्या या संघर्षमय प्रवासात त्याच्या आई वडिलांनी त्याला खंबीर साथ दिली.


घरात अठरा विश्व दारिद्र्य. शेतकरी वडील व फुगा फॅक्टरीत मोलमजुरी करणारी आई यांनी स्वतःचे आयुष्य खर्ची घालून संजयला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. या प्रोत्साहनातून त्याने शिकण्याची आस उरी बाळगली. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज त्याने करून या पदापर्यंत मजल मारली आहे. मजल दर मजल करत त्याचा संघर्षमय प्रवास त्याच्या डोळ्यातून बोलताना जाणून येत होता. जिल्हा परिषदेतून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर माध्यमिक आश्रम शाळा व पुढे पनवेलच्या एमजीएम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करताना त्याच्या वाटेत अनेक खाच-खळगे होते. हे खाचखळगे टप्प्याटप्प्याने पार करत त्याने स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला. यादरम्यान या परीक्षेची तयारी करत असताना इंजिनियर असूनही एका कंपनीत सुमारे वर्षभर सोळा सोळा तास मोलमजुरी करून त्याने जिवाचे रान केले व याच पैशातून राज्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. परिसरात शिक्षणाचा थांग पत्ताही नसलेल्या संजयने आपण ही परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनू असा दृढनिश्चय व चंग बांधला.


घरात अभ्यासासाठी पोषक वातावरण नसल्याने त्याने मार्गदर्शन केंद्र निवडण्यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले. याच वेळी विक्रमगडच्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रची त्याला माहिती मिळाली. यादरम्यान त्याला अनेक मार्गदर्शक यांसह त्याला मदत करणारे मित्र व शिक्षक परिवार लाभला. यातूनच त्याचा आत्मविश्वास वाढला व खऱ्या अर्थाने तेथूनच त्याने आपल्या आयुष्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात यशस्वी गाथा लिहिली. एका खेड्यातून आलेल्या या मुलाने महाराष्ट्राच्या इतिहासात आदिवासी समाजातून चमचमणाऱ्या कार्याचा इतिहास सुवर्ण अक्षरात कोरला. जगाच्या पाठीवर कुठेही असो इच्छाशक्तीच्या जोरावर काहीही करता येते हे संजयच्या प्रयत्नाने स्पष्ट झाले आहे असे सांगून संपूर्ण कोकणात असे अनेक अधिकारी घडवून महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये आपले व कुटुंबाचे अधिकारी पाहायचे आहेत, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आता वर्ग दोनचा अधिकारी झालो असलो तरी पुढील परीक्षा देऊन वर्ग 1 चा अधिकारी होण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. याचबरोबरीने मी राहत असलेल्या खेड्यात शिक्षणासाठी तरुणांना प्रोत्साहन देऊन माझ्यासारखे अधिकारी बनण्यासाठी त्यांना बळ देईन असे संजय म्हणतो.


गेली अनेक वर्ष घरात हलाखीची परिस्थिती होती या हालाखीच्या परिस्थितीत ही संजयने जिद्दीने शिकून अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे आता आमचं दरिद्र दूर होण्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे आता आमची परिस्थिती चांगली येईल व संजय सारखा इतर गोरगरीब मुलांनी ही अधिकारी होऊन स्वतःच्या घरची परिस्थिती चांगली कराव असे संजय ची आई लक्ष्मी यांनी म्हटले आहे. आज संजय राज्य अभियांत्रिकी परीक्षा पास होऊन मोठा अधिकारी झाल्याचा आनंद आहे असे त्याच्या सोबत असणारे त्याचे मित्र आनंदाने सांगतात त्याने परीक्षा पास केल्यामुळे तो आमचा आदर्श बनला आहे. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्याच्यासारखा अधिकारी बनण्याचे स्वप्न आता पाहत आहोत असे त्याचे मित्र गण सांगतात.


घरची परिस्थिती एकदमच हलाखीची असल्यामुळे अभ्यासासाठी साहित्य खरेदी करण्याची संजयची कुवत नव्हती. या परिस्थितीवर मात करण्यासाठी संजयने बांबूच्या आधारावर स्टडी टेबल तयार केले. तारा आणून त्याने या टेबलावर प्रकाश व्यवस्था उभारली व एका दहा बाय पंधरा च्या खोलीत सारवलेल्या जमिनीवर बसून त्यांनी आपला अभ्यास पूर्ण करून त्याची जिद्द त्यांनी तडीस नेली आहे.