Sindhudurg Submarine Project : महाराष्ट्रातला (Maharashtra) आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार अशी चर्चा रंगली आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) किनाऱ्यावर होणारा पाणबुडी प्रकल्प (Submarine Project) गुजरातला (Gujrat) जाणार, असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. आशिया खंडातील पहिला पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेमधील निवती रॉक या ठिकाणी अरबी समुद्रात प्रस्तावित आहे. पाणबुडीतून साधारणत: 20 ते 25 व्यक्ती पाणबुडीमध्ये बसून समुद्राखाली जाऊन समुद्राखालील अंतरंग न्याहाळू शकतात. कोकणात सर्वात जास्त कोरल्स, रंगीबेरंगी मासे आणि समुद्राच्या आतील अंतरंग दिसणार अनोखा विश्व हे फक्त वेंगुर्ल्यातील निवती रॉक या ठिकाणी असून हे अनेक सर्वेक्षणामधून समोर आलं आहे. 


त्यासोबतच महाराष्ट्रातील पहिलं स्कुबा सेंटर असलेलं तारकर्ली स्कुबा सेंटरमधून पर्यटकांना स्कुबा करण्यासाठी देखील याच ठिकाणी नेलं जातं आणि स्कुबाच्या माध्यमातून समुद्राखालील अनोखं विश्व पर्यटकांना न्याहाळता येतं. मात्र पाणबुडी प्रकल्प या ठिकाणी झाला तर लहानांपासून अबाल वृद्धांपर्यंत सर्वांना पाणबुडीतून जाऊन या ठिकाणचं अनोखं विश्व न्याहाळता येऊ शकतं. 


आमदार वैभव नाईक यांचा आरोप


सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनाऱ्यावर पाणबुडी प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थसंकल्पीय तरतूद केलेली असताना सुद्धा हा प्रकल्प गुजरातला जात असल्याचा चर्चा आता रंगली आहे. याविरुद्ध शिवसेना ठाकरे गट आंदोलन उभारणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे आपलं कोकण. याच कोकणातील वेंगुर्ले मधील निवती रॉक अर्थात निवती दीपगृह जवळ पाणबुडी प्रकल्प 2017 साली प्रस्तावित करण्यात आला. मात्र राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे हा प्रकल्प अद्यापही रखडलेला आहे. केंद्र सरकारच्या सागर माला योजनेअंतर्गत देशात महाराष्ट्रातील वेंगुर्ला निवती रॉक आणि गुजरात मधील द्वारका या ठिकाणी मंजुरी मिळाली होती.


महाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार?


सध्या हाच प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत गुजरातमधील द्वारका आणि सिंधुदुर्गातील वेंगुर्ला निवती रॉक या ठिकाणी 2017 साली हे प्रकल्प प्रस्तावित होते. मात्र गुजरात सरकारने हा प्रकल्प सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र कोकणातील राजकीय अनास्थामुळे हा प्रकल्प अद्यापही रखडलेला आहे. त्यातच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनाऱ्यावर होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.


सिंधुदुर्ग किनाऱ्यावर होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार?


देशातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदूर्ग जिल्ह्या असून जिल्ह्यात म्हणाव्या तशा पर्यटनाच्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून कोकणाला संबोधलं जातं, मात्र याच कोकणात पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असलेले पाणबुडी, सी वर्ल्ड यासारखे प्रकल्प धूखात फाईलमध्येच अडकून पडले आहेत. याला खरी राजकीय आणि प्रशासकीय अनास्था जबाबदार आहे. असे प्रकल्प राबवल्यास कोकणातून पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो.