नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशमुखांच्या लोकमंगल मल्टिस्टेट बँकेनं 10 तारखेलाच 500 आणि हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचं पत्र आपल्या प्रत्येक शाखांना पाठवलं होतं. त्यामुळे आपल्याच शाखांना नोटा न स्वीकारण्याचा सल्ला देणाऱ्या देशमुखांनी आपल्याच शाखांमध्ये भरण्यासाठी 500 आणि हजाराच्या 91 लाखांच्या नोटा का पाठवल्या असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकमंगलची रक्कम ही 16 तारखेला जप्त केली, तर लोकमंगलचे पत्र हे 10 तारखेला काढले होते. त्यामुळे आदेशाच्या 6 दिवसांनंतरही आपल्याच आदेशाला बँकेनं केराची टोपली दाखवली का, असा प्रश्न निर्माण होत आहे. सहकार सहाय्यक निबंधकांनीही सुभाष देशमुख यांना क्लीन चिट दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
जप्त कॅशप्रकरणी सहकारमंत्री सुभाष देशमुखांना क्लीन चिट
निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं गेल्या बुधवारी जप्त केलेली 90 लाख 50 हजारांची रक्कम ही लोकमंगल मल्टिस्टेटचीच असल्याचा अहवाल सहाय्यक निबंधकांनी दिला आहे. बँकेने दाखवलेल्या रेकॉर्डनुसार पैसे वेगवेगळ्या शाखेतून जमा करुन मुख्य शाखेकडे चालले होते. त्यावेळी म्हणजे बुधवारी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं ही 90 लाख 50 हजारांची रक्कम जप्त केली. जप्त केलेल्या रकमेतील सर्व नोटा हजार-पाचशेच्या होत्या.