पबमधील किरकोळ वादानंतर नागपुरात युवकाची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 21 Nov 2016 09:58 AM (IST)
नागपूर : पबमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. नागपुरात रविवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. हत्येनंतर आरोपी पसार झाले आहेत. शुभम महाकाळकर असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. नागपुरातील क्लाऊड सेव्हन या पबमध्ये रविवारी रात्री दोन गटांमध्ये भांडण झालं. त्यानंतर पबमध्ये तोडफोडही करण्यात आली. या वादानंतरच शुभमवर हल्ला करुन त्याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर आरोपी पसार झाले असून मारेकऱ्यांबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. नागपुरात गेल्या काही महिन्यांमध्ये हत्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.