पंढरपूर : पंढरपुरातील तरुणाचा ऑस्ट्रेलियात संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ओमप्रकाश ठाकरे या विद्यार्थ्याचा मृतदेह मेलबर्नमधील राहत्या घरी आढळला.
पंढरपुरातील शिवपार्वती नगरमध्ये राहण्याऱ्या महादेव संदिपान ठाकरे यांचा ओमप्रकाश हा मुलगा. ओमप्रकाश सिव्हिल इंजिनिअरिंगच्या उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील 'स्विनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी हॉवथर्न'मध्ये गेला होता.
शनिवारी पहाटे ठाकरे कुटुंबीयांना ओमप्रकाशचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अवघ्या काही तासांपूर्वी, म्हणजे मध्यरात्री दोन वाजता ओमप्रकाशचं आई-वडिलांशी फोनवर बोलणंही झालं होतं.
ओमप्रकाश अतिशय हुशार, अभ्यासू आणि हरहुन्नरी असल्याचं त्याचे नातेवाईक सांगतात. पुण्यामध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना सुट्टीत पंढरपूरला आल्यावर तो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असे.
एक महिन्यापूर्वीच ओमप्रकाश आपल्या बहिणीच्या लग्नासाठी पंढरपूरला आला होता. त्यानंतर तो मेलबर्नला पुन्हा आला होता.